शेतीची कामं डोक्यावर अन् सिल्लोडच्या धावडा शिवारात दोन बिबट्यांचा वावर; शेतकरी भयभीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 16:45 IST2025-07-04T16:40:16+5:302025-07-04T16:45:01+5:30
धावडा हे गाव डोंगरालगत असून परिसरात मोठे घनदाट जंगल आहे.

शेतीची कामं डोक्यावर अन् सिल्लोडच्या धावडा शिवारात दोन बिबट्यांचा वावर; शेतकरी भयभीत
सिल्लोड : तालुक्यातील धावडा शिवारात पिकाची राखण करताना एका शेतकऱ्याला रविवारी मध्यरात्री १ वाजता दोन बिबटे दिसले. ग्रामपंचायत सदस्या रिना संदीप इंगळे यांनी बिबटे पकडण्यासाठी पिंजरे बसवण्याची मागणी वन विभागाकडे केली आहे. यासंदर्भात बुधवारी (दि. ३) दुपारी त्यांनी निवेदनही दिले.
धावडा हे गाव डोंगरालगत असून परिसरात मोठे घनदाट जंगल आहे. येथील वन्यप्राणी पिकांचे नुकसान करतात. यामुळे पिकांची राखण करण्यासाठी शेतकरी रात्री शेतात जातात. असेच रविवारी रात्री विलास साहेबराव भिवसने हे शेतात पिकांची राखण करण्यासाठी गेलेले असता त्यांना दोन बिबटे दिसून आले. घाबरल्याने भिवसने यांनी तातडीने तेथून काढता पाय घेत गाव गाठले आणि ही माहिती ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांना दिली. बुधवारी सदस्या रिना इंगळे यांनी वन विभागाला निवेदन देऊन पिंजरे बसवण्याची मागणी केली.
वनपरिक्षेत्र अधिकारी अनभिज्ञ
तालुक्यात शेतकऱ्याला दोन बिबटे दिले. परंतु, या घटनेपासून वनपरिक्षेत्र अधिकारी यशपाल दिलपाक अनभिज्ञ आहेत. याबाबत त्यांना विचारले असता, मला माहिती नाही. माहिती घेऊन सांगतो, असे उत्तरे त्यांनी दिले.
ठसे तपासून करणार खात्री
या घटनेची माहिती वन विभागाला मिळाली आहे. प्राण्याचे शेतातील ठसे तपासून ते बिबट्याचे आहेत का, याची खात्री केली जाईल. मात्र, गेल्या वर्षभरात या परिसरात बिबट्याने जनावरांचा फडशा पाडल्याची एकही घटना समोर आलेली नाही.
- गणेश परदेशी, वनरक्षक