तलवार घेऊन दहशत पसरवणारे दोन गुन्हेगार हातकडीसह पोलिस ठाण्यातून पसार
By सुमित डोळे | Updated: May 8, 2024 19:10 IST2024-05-08T19:08:12+5:302024-05-08T19:10:56+5:30
लघुशंका आल्याचे नाटक करत दोघे पोलिस ठाण्यातून झाले पसार

तलवार घेऊन दहशत पसरवणारे दोन गुन्हेगार हातकडीसह पोलिस ठाण्यातून पसार
छत्रपती संभाजीनगर : तलवार घेऊन दहशत निर्माण करताना रंगेहाथ पकडलेल्या दोन गुंडांना ठाण्यात नेऊन बसवताच त्यांनी हातकडीसह ठाण्यातून पोबारा केला. मंगळवारी मध्यरात्री १२ वाजता ही घटना घडली. विकास दारासिंग जाधव (२३, रा. वरणगाव, ता. भुसावळ), सुनिल एकनाथ बेलदार उर्फ जाधव (२३, रा. धाबापिंपरी मुक्ताईनगर, जि. जळगाव) असे आरोपींचे नाव आहे.
गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक विनायक शेळके यांनी मंगळवारी रात्री उशिरा छावणी परिसरातून सुनिल व विकास ला शस्त्रांसह ताब्यात घेतले होते. पुढील कारवाईसाठी शेळके यांनी दोघांना छावणी पाेलिस ठाण्यात हजर केले. दोघांना शस्त्र, आरोपींच्या कारसह कर्तव्यावर हजर सहायक फौजदार बन्सवाल यांच्या ताब्यात देऊन रितसर नोंद करुन निघून गेले. त्यानंतर बन्सवाल हे सहकारी कर्मचाऱ्यासह गुन्हा दाखल करण्यात व्यस्त असताना आरोपींनी लघुशंका आल्याचे नाटक केले. बन्सवाल यांनी मात्र दोघांची हातकडी काढून कुठल्याही सुरक्षेशिवाय बाथरुमच्या दिशेने पाठवले. दोघांनी मात्र ठाण्याच्या मागील बाजुने तत्काळ हातकडीसह पोबारा केला. याप्रकरणी उपनिरीक्षक सुरेश माळी यांच्या तक्रारीवरुन पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी उशिरापर्यंत त्यांचा शोध सुरू होता.