पडेगावात दोन भावांना चाकूने भोसकले!
By Admin | Updated: November 30, 2014 00:59 IST2014-11-30T00:17:28+5:302014-11-30T00:59:36+5:30
औरंगाबाद : गल्लीत उभे राहून अश्लील शिवीगाळ का करता, असा जाब विचारणाऱ्या दोन भावांना दोन जणांनी चाकूने भोसकल्याची घटना शनिवारी दुपारी पडेगाव परिसरातील प्रिया कॉलनीत घडली.

पडेगावात दोन भावांना चाकूने भोसकले!
औरंगाबाद : गल्लीत उभे राहून अश्लील शिवीगाळ का करता, असा जाब विचारणाऱ्या दोन भावांना दोन जणांनी चाकूने भोसकल्याची घटना शनिवारी दुपारी पडेगाव परिसरातील प्रिया कॉलनीत घडली.
भोसकलेल्या शेख सिराज शेर रफिक (२२) व शेख हारुण शेख रफिक (२५, रा. प्रिया कॉलनी) यांच्यावर घाटीत उपचार सुरू आहेत. यावेळी नागरिकांनी आरोपींना पकडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा झटापटीत आरोपींची दुचाकी, मोबाईलसह चाकू घटनास्थळीच पडला. ते सोडून आरोपी पसार झाले.
घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन आरोपी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास प्रिया कॉलनीत मोटारसायलकवर आले. शेख सिराज यांच्या गल्लीतच राहणाऱ्या एका महिलेशी पैशाच्या देवाण-घेवाणीवरून आरोपींनी वाद घालण्यास सुरुवात केली. दोन्ही आरोपी त्या महिलेला अश्लील शिवीगाळ करू लागले.
हा गोंधळ सुरू असताना शेख सिराज व शेख हारुण हे दोघे घरातून बाहेर आले आणि ‘येथे महिला राहतात. तुम्ही अश्लील शिवीगाळ का करता?’ असा जाब विचारला. तेव्हा आरोपींनी त्या महिलेला शिवीगाळ करणे सोडले आणि चाकू काढून शेख सिराज व त्याचा भाऊ शेख हारुण या दोघांवर चाकूने सपासप वार केले. त्यावेळी आरडाओरड झाल्यानंतर आसपासचे नागरिक धाऊन आले. आरोपींना पकडण्याच्या प्रयत्नात झटापट झाली. तेव्हा आपली दुचाकी, चाकू व मोबाईल सोडून आरोपींनी तेथून पळ काढला.
त्यानंतर जखमी शेख सिराज व शेख हारुण यांना उपचारासाठी तातडीने घाटीत पाठविण्यात आले. इकडे रात्री उशिरापर्यंत छावणी पोलिसांनी या घटनेचा गुन्हाच नोंदविला नव्हता. किरकोळ घटना आहे, असे सांगून पोलीस गुन्हा नोंदविण्यास टाळाटाळ करताना दिसून आले.