भरधाव कारच्या धडकेत दोन दुचाकींचा चुराडा; दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2023 17:28 IST2023-05-09T17:26:49+5:302023-05-09T17:28:50+5:30
परभणी-गंगाखेड महामार्गवरील दैठणाजवळील घटना

भरधाव कारच्या धडकेत दोन दुचाकींचा चुराडा; दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
- लक्ष्मण कच्छवे
दैठणा (जि.परभणी) : दोन दुचाकी एका कारच्या विचित्र अपघातात दोन ठार, एक गंभीर, तर सहा जण जखमी झाल्याची घटना परभणी- गंगाखेड महामार्गावरील दैठणाजवळ मंगळवारी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास घडली. यात दुचाकींचा चुराडा झाला असून कारचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यात विवेक अनिल नाईक (२४), दीपक मारुती कच्छवे (२५), दोघे रा. दैठणा यांना मृत घोषित केले. पवन माधव कच्छवे (२६) हा गंभीर जखमी झाला आहे.
परभणी- गंगाखेड राष्ट्रीय महामार्गावरील अपघाताची मालिका थांबताना दिसत नाही. मंगळवारी दैठणा येथून तीन युवक पोखर्णी नरसिंह येथे मित्राच्या लग्नासाठी जात होते. दरम्यान परभणीहून गंगाखेडकडे जाणारी एक कार भरधाव वेगात येत होती. त्याच वेळी एका हॉटेलसमोरून एक दुचाकी कारसमोर आली. यात कार आणि दुचाकीची धडक झाली. यात दुचाकीवरील दोघे जण जखमी झाले. दरम्यान चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने समोरून येणाऱ्या तीन युवकांच्या दुकचाकीलाही जोरदार धडक दिली. अपघात एवढा भीषण होता की दुचाकीचा चुराडा झाला. तर कार रस्त्याच्या खाली एका खड्ड्यात जाऊन पडली.
यात लग्नाला जाणारे दुचाकीवरील तिघे वर्गमित्र गंभीर जखमी झाले. नागरिकांनी त्यांना उपचारासाठी परभणी येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून विवेक नाईक, दीपक कच्छवे दैठणा यांना मृत घोषित केले. पवन कच्छवे हा गंभीर जखमी झाला आहे, तर अन्य दुसऱ्या दुचाकीवरील दोघे आणि कारमधील चार जण किरकोळ जखमी आहेत. अपघाताची माहिती कळताच दैठणा बालाजी तिप्पलवाड, बळीराम मुंडे आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. अधिक तपास पोलिस करीत आहेत.