अडीच महिन्यांत ८०० जणांना घेतला चावा

By Admin | Updated: July 14, 2014 01:05 IST2014-07-14T00:53:18+5:302014-07-14T01:05:10+5:30

संतोष हिरेमठ , औरंगाबाद औरंगाबाद : शहरातील वेगवेगळ्या वसाहतींत मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यांचा उपद्रव वाढत आहे.

Twice a month, 800 people have been bitten | अडीच महिन्यांत ८०० जणांना घेतला चावा

अडीच महिन्यांत ८०० जणांना घेतला चावा

संतोष हिरेमठ , औरंगाबाद
औरंगाबाद : शहरातील वेगवेगळ्या वसाहतींत मोकाट कुत्र्यांची संख्या आणि त्यांचा उपद्रव वाढत आहे. रात्री- अपरात्री घराबाहेर जावे लागणाऱ्यांना त्यांची दहशत बसलेली आहे.
गेल्या अडीच महिन्यांत जवळपास ८०० जणांना या मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे. अचानक हल्ला करून चावा घेत असल्याने शहरातील रस्त्यांवर मोकाट कुत्र्यांची दहशत दिवसेंदिवस वाढतच आहे. या मोकाट दहशतीला पकडण्यात महापालिका प्रशासन अपयशी ठरत असल्याचे दिसते.
रस्ते, चौक आणि गल्लीबोळांत व कचऱ्याच्या ठिकाणी त्यांच्या टोळ्या दिसतात. दिवसा या मोकाट कुत्र्यांचा तेवढा त्रास होत नाही. दिवसा न दिसणारी कुत्री रात्री रस्त्यावर येतात. रात्री ही कुत्री पादचारी आणि दुचाकीचालकांवर धावून जातात, प्रसंगी चावतातही. त्यातील अनेक कुत्री दुचाकीचा पाठलाग करतात.
वाहनचालकाने वेग वाढवताच ते घसरण्याचे, दुसरे वाहन समोर येऊन अपघात घडले आहेत. रस्त्यांवर आणि गल्लीबोळांत या कुत्र्यांना तेथील नागरिक दगड मारून हुसकावून लावतात. काही वेळेतच ही भटक्यांची टोळी पुन्हा तेथे येते. रात्री एकट्या- दुकट्यावर ही मोकाट जनावरे हल्ला करतात.
शहराबाहेर सोडतात?
शहरात पकडलेली कुत्री सातारा, वाळूज परिसरात सोडण्यात येत असल्याचे या भागातील रहिवाशांनी सांगितले. त्यामुळे अचानक मोकाट कुत्र्यांची संख्या वाढत असल्याने रात्रीच्या वेळी बाहेर पडणे अवघड झाल्याचे नागरिकांनी सांगितले.
निर्बीजीकरण शस्त्रक्रिया
रोज जवळपास २० ते २५ कुत्र्यांना पकडले जाते. त्यांच्यावर निर्बीजीकरण शस्त्रक्रिया करून नियमानुसार ज्या भागातून त्याला पकडले होते त्याच भागात त्यांना पुन्हा सोडले जाते, असे महापालिकेचे मुख्य पशुसंवर्धन अधिकारी डॉ. बी.एस. नाईकवाडे यांनी सांगितले. शहरातील विविध भागांत रात्री खाद्यपदार्थ, मांस विक्रीची दुकाने आणि कचराकुंड्यांपाशी ही कुत्री दिसतात. अन्नासाठी एकमेकांवर ते चालून जातात. त्याचा त्रास तेथील पादचारी व रहिवाशांना होतो. हिंस्र बनलेल्या या श्वानांना हकलण्याची हिंमत कोणाला होत नाही.
तात्काळ उपचार करावेत
कुत्रा चावल्यावर जखम तात्काळ पाणी आणि साबणाने धुऊन काढावी. जखम नळाच्या किंवा मगच्या धारेखाली धरून स्वच्छ करावी. यामुळे ९० टक्के धोका कमी होतो. डॉक्टरांना तात्काळ दाखवावे, असे शासकीय वैद्यकीय रुग्णालयातील (घाटी) मेडिसीन विभागप्रमुख डॉ. मंगला बोरकर यांनी सांगितले.
घाटी रुग्णालयात उपचारासाठी आलेले रुग्ण
महिनारुग्णांची संख्या
मे ३५८
जून३२२
जुलै (१२ पर्यंत)१३०
एकूण८१०
कुत्र्यांचा उपद्रव वाढलेले रस्ते
आकाशवाणी चौक, विष्णूनगर, उत्तमनगर, शहानूरवाडी, पैठणगेट, खोकडपुरा, आविष्कार कॉलनी, जुना मोंढा, चिश्तिया कॉलनी, कॅनॉट गार्डन, शिवाजीनगर, सेव्हन हिल, उल्कानगरी, बेगमपुरा, भारतनगर,
चिक लठाणा, रामनगर, सातारा परिसर, कांचनवाडी, वाळूज, पंढरपूर परिसरातील मुख्य रस्त्यांबरोबर अंतर्गत रस्ते.
दूरध्वनी क्रमांक बंद
महापालिकेने डॉग स्कॉडचा दूरध्वनी क्रमांक सामान्य नागरिकांना उपलब्ध करून दिला होता.
४या क्रमांकावर ज्या भागातून फोन यायचा त्या भागात व्हॅन पाठविली जायची; परंतु गेल्या काही दिवसांपासून हा क्रमांक बंद आहे.
त्यामुळे तक्रार कोणाकडे करायची, असा प्रश्न नागरिकांसमोर आहे.
रात्री त्रासदायक बनलेल्या या कुत्र्यांची दहशत अनेकदा दिवसाही अनुभवास येते. घरासमोर खेळणाऱ्या मुलांना त्यांनी चावल्याच्या घटना घडल्या आहेत.

Web Title: Twice a month, 800 people have been bitten

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.