तुळजापुरात भक्तीचा मळा
By Admin | Updated: October 8, 2014 00:51 IST2014-10-08T00:34:53+5:302014-10-08T00:51:03+5:30
तुळजापूर : श्री तुळजा भवानीची चार दिवसीय श्रमनिद्रा बुधवारी ८ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास संपणार असून पंलगावरून देवीची सिंहासनावर पूर्वप्रतिष्ठापना होऊन नित्योपचार,

तुळजापुरात भक्तीचा मळा
तुळजापूर : श्री तुळजा भवानीची चार दिवसीय श्रमनिद्रा बुधवारी ८ आॅक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास संपणार असून पंलगावरून देवीची सिंहासनावर पूर्वप्रतिष्ठापना होऊन नित्योपचार, अभिषेक पुजेस प्रारंभ होईल. दुपारी नित्योपचार अभिषेक पूजा व त्यानंतर अलंकार महापुजा मांडण्यात येणार आहे. रात्री अभिषेक पुजेनंतर सोलापूर येथील लाड समाजाच्या मानाच्या काठ्याबरोबर छबीना मिरवणूक काढण्यात येणार असून महंताचा जोगवा हे धार्मिक विधीही यावेळी होणार आहे. दरम्यान, या उत्सवासाठी मंगळवारी रात्रीपर्यंत लाखो भाविक तुळजापुरात दाखल झाले आहेत.
तुळजापुरात बुधवारी श्री तुळजाभवानी मातेचा अश्विनी पौर्णिमा उत्सव साजरा होत आहे. यानिमित्त तुळजापूरकडे येणारे सर्वच रस्ते सोमवारी रात्रीपासून भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. नळदुर्ग रस्त्यावर आंध्र, कर्नाटक, तेलंगणा व उमरगा परिसरातील हजारो भाविक ‘आई राजा उदो उदो, जय बोलो, जय मातादी’चा जयघोष करीत हलगी, ताशा, झांजाच्या वाद्यात व भक्तीगीतांवर नृत्य करीत शहरात दाखल होत आहेत. काही महिला भाविक नवसपूर्ती करण्यासाठी दंडवत घालत येताना दिसून येत आहेत. सोलापूर रस्त्यावरूनही हजारो भाविक घाटशीळ येथे दाखल होत असून, घाटशीळचे दर्शन घेऊन ते मंदिरात येत आहेत. मंगळवारी सकाळी मंदिर परिसरात तुरळक गर्दी होती. मात्र, सायंकाळनंतर मंदिरातील दर्शन मंडपाचे चारही मजले भाविकांनी फुल्ल झाले होते. दरम्यान, दुपारी दोन ते तीन वाजेच्या सुमारास शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. यामुळे पायी येणाऱ्या भाविकांचे मोठे हाल झाले. व्यापारी, फेरीवाले यांचीही मोठी धावपळ उडाली. या पावसामुळे घाटशीळ रस्ता, आंबेडकर चौक, उस्मानाबाद रोडवर चिखल व पाणी साचल्याने भाविकांना चालणेही अवघड झाले होते. भाविकांची वाढती गर्दी पासून एसटी महामंडळाने सोलापूर, हुमनाबाद, गुलबर्गा या मार्गावर जादा बसगाड्या सुरू केल्या आहेत. सध्या जुन्या स्थानकातून सोलापूरसाठी तर नव्या स्थानकातून कर्नाटक, लातूरकडे जादा बसगाड्या सोडण्यात येत आहेत.
महामार्गावर खड्ड्यांचा त्रास
श्री तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी पायी जाणाऱ्या भाविकांमध्ये कर्नाटक तसेच पश्चिम महाराष्ट्रातील भाविकांची संख्याही लक्षणीय आहे. यात काही भाविक विनावाहन (पायात काहीही न घालता) जातात. परंतु, तुळजापूर-सोलापूर रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असल्याने या पायी जाणाऱ्या भाविकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय पायी जाणाऱ्या भाविकांच्या गर्दीत चारचाकी वाहनांचीही रेलचेल दिसून आली. दरम्यान, मार्गावर प्रथमोपचार केंद्रे तसेच अन्नदानासाठी विविध संस्था, संघटनांच्या वतीने स्टॉल्सही लावण्यात आले आहेत. (वार्ताहर)