त्रिमूर्ती शाळा अखेर जमीनदोस्त
By Admin | Updated: July 6, 2016 00:39 IST2016-07-05T23:59:34+5:302016-07-06T00:39:45+5:30
औरंगाबाद : विश्वभारती कॉलनी येथील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर १९८४ पासून त्रिमूर्ती बालक मंदिर ही शाळा चालविण्यात येत होती.

त्रिमूर्ती शाळा अखेर जमीनदोस्त
औरंगाबाद : विश्वभारती कॉलनी येथील महापालिकेच्या मालकीच्या भूखंडावर १९८४ पासून त्रिमूर्ती बालक मंदिर ही शाळा चालविण्यात येत होती. १८ जून रोजी महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने शाळेला सील ठोकले होते. मंगळवारी भर पावसात मनपाच्या अतिक्रमण हटाव पथकाने भूखंडावरील संपूर्ण बांधकाम जमीनदोस्त केले.
जय विश्वभारती गृहनिर्माण संस्थेने १९८४ मध्ये महापालिकेच्या मालकीच्या ओपन स्पेसमधील ५२५ चौरस मीटर जागा त्रिमूर्ती बालक मंदिराला ९९ वर्षांच्या करारावर भाडेतत्त्वावर दिली. मागील तीन दशकांपासून या भूखंडावर शाळा सुरू होती. भूखंडाच्या मालकीचा वाद काही वर्षांपूर्वी उफाळून आला. वाद औरंगाबाद खंडपीठात गेला. २००५ मध्ये न्यायालयाने मनपाच्या बाजूने निकाल दिला. मागील ११ वर्षांमध्ये मनपा प्रशासनाने जागेचा ताबा घेतला नव्हता. दरम्यान, त्रिमूर्ती बालक मंदिर प्रशासन सर्वोच्च न्यायालयात गेले. न्यायालयाने त्रिमूर्ती बालक मंदिराकडे मालकीहक्क नसल्याने याचिका फेटाळून लावली. दरम्यान, मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांच्यासमोर हे प्रकरण आले. प्रशासकीय अधिकारी महावीर पाटणी यांच्या उपस्थितीत त्रिमूर्ती बालक मंदिरला सील ठोकण्यात आले होते.
शाळेत विद्यार्थ्यांशी संबंधित कागदपत्रे, बाकडे यासह इतर शैक्षणिक साहित्य होते. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेत शाळेतील हे साहित्य दुसऱ्या जागेत स्थलांतरित करता यावे यासाठी महापालिकेने काही दिवसांचा कालावधी दिला होता. त्यानंतरही साहित्य नेले जात नसल्याने अखेर आज पालिकेच्या अतिक्रमण पथकाने अतिक्रमण पाडण्याची कारवाई सुरू केली. महापालिकेकडून कारवाईचा दिवस उजाडल्याने शाळा व्यवस्थापनाकडून शाळेतील बाकडे, फळा असे साहित्य इतर ठिकाणी नेण्यात आले. महापालिकेच्या ट्रकमध्ये हे साहित्य नेण्यात आले. इमारतीतील संपूर्ण साहित्य इतर ठिकाणी हलविण्यात आल्यानंतर इमारतीस पाडण्यास सुरुवात करण्यात आली. संततधार पावसामुळे कामकाजात अडथळा होत होता.