गुरुजींच्या बदल्यांचा पोळा फुटला! छत्रपती संभाजीनगरातील १ हजार ९५८ शिक्षकांची बदली
By विजय सरवदे | Updated: March 25, 2023 19:49 IST2023-03-25T19:48:30+5:302023-03-25T19:49:23+5:30
जिल्हा परिषद शाळांतील प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत आणि आंतर जिल्हा बदली प्रक्रिया यावेळी राज्यस्तरावरुन ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्यात आली.

गुरुजींच्या बदल्यांचा पोळा फुटला! छत्रपती संभाजीनगरातील १ हजार ९५८ शिक्षकांची बदली
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा परिषद शिक्षकांच्या ऑनलाइन बदलीची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. या प्रक्रियेत जिल्ह्यातील १ हजार ९५८ शिक्षकांचीबदली झाली असून यावेळी पहिल्यांदाच कुठे बदली झाली, त्याची माहिती संबंधितांना मेलद्वारे प्राप्त झाली आहे. मात्र, मे अखेरपर्यंत बदली झालेल्या शिक्षकांना सध्याच्या शाळेतून कार्यमुक्त केले जाणार आहे.
जिल्हा परिषद शाळांतील प्राथमिक शिक्षकांची जिल्हांतर्गत आणि आंतर जिल्हा बदली प्रक्रिया यावेळी राज्यस्तरावरुन ऑनलाइन प्रणालीद्वारे करण्यात आली. कोरोना संसर्गामुळे मागील दोन वर्षांपासून जि.प. शाळांतील प्राथमिक शिक्षकांची बदलीची प्रक्रिया रखडली होती. नोव्हेंबर २०२२ पासून जिल्हांतर्गत बदलीची प्रक्रिया राबविण्यात आली. तब्बल पाच महिने बदलीची ही प्रक्रिया सुरू होती. विशेष संवर्ग भाग-१, विशेष संवर्ग भाग-२, बदली अधिकारप्राप्त शिक्षक, बदलीपात्र शिक्षक, विस्थापित शिक्षक, अवघड क्षेत्रातील शाळांत रिक्तजागी बदली झालेले शिक्षक असे एकूण १ हजार ९५८ शिक्षकांच्या यावेळी बदल्या झाल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सोईस्कर गावांतील शाळेत अध्यापन करणारे आता दुर्गम भागांत, तर काहीजणांना दुर्गम भागातून रस्त्यावरील गावांत नेमणूक मिळाल्यामुळे बदली झालेल्या शिक्षकांमध्ये ‘कही खुशी, कही गम’, असे वातावरण निर्माण झाले आहे.
नवीन शैक्षणिक वर्षापूर्वी हजर व्हा
एप्रिल महिना हा परीक्षेचा असून १ मे रोजी निकाल जाहीर केला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडू नये म्हणून बदली झालेल्या शिक्षकांना मे महिन्यात कार्यमुक्त करण्याचे शासनाने २४ फेब्रुवारीच्या पत्रान्वये जाहीर केले आहे. या पत्रानुसार १ ते १५ मेपर्यंत संबंधित शिक्षकांना कार्यमुक्तीचे आदेश निर्गमित करणे व १६ ते ३१ मे या कालावधीत शिक्षकांना प्रत्यक्ष कार्यमुक्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याआधी बदली झालेल्या शिक्षकांना नेमणुकीच्या ठिकाणी हजर व्हावे लागणार आहे.
बदली झालेल्या शिक्षकांची संख्या
२२४- विशेष संवर्ग भाग १
२०३- विशेष संवर्ग भाग २
१८१- बदली अधिकारप्राप्त शिक्षक
११८८- बदलीपात्र शिक्षक
९४- विस्थापित शिक्षक
६८- अवघड क्षेत्रातील रिक्त जागा