अवैध दारूची चाेरट्या मार्गाने वाहतूक; लातुरात दहा लाखांचा मुद्देमाल जप्त !

By राजकुमार जोंधळे | Updated: November 12, 2022 19:15 IST2022-11-12T19:14:53+5:302022-11-12T19:15:24+5:30

एका वाहनातून अवैधरीत्या दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली.

Trafficking illegal liquor; 10 lakhs worth of goods seized in Latur! | अवैध दारूची चाेरट्या मार्गाने वाहतूक; लातुरात दहा लाखांचा मुद्देमाल जप्त !

अवैध दारूची चाेरट्या मार्गाने वाहतूक; लातुरात दहा लाखांचा मुद्देमाल जप्त !

लातूर : चाेरट्या मार्गाने दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या टेम्पाेसह एकाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून विदेशी दारू आणि बीअरचा साठा जप्त करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने या कारवाईत टेम्पाेसह दारूसाठा असा एकूण १० लाख ३४ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे, तर लातूरसह मुरुड परिसरातील हाॅटेलवर पथकाने छापा टाकला. यावेळी एकूण ११ जणांना अटक केली असून, त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने प्रत्येकी ५०० रुपयांचा दंड केला आहे.

लातूरसह जिल्ह्यातील विविध भागांत अवैध दारूविक्री माेठ्या प्रमाणावर केली जात असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाली. या माहितीच्या आधारे औरंगाबाद विभागाचे उपायुक्त प्रदीप पवार, लातूरचे अधीक्षक केशव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली लातुरातील गरुड चाैकात असलेल्या एका हाॅटेलवर छापा टाकण्यात आला. याप्रकरणी अवैध मद्याचा गुन्हा नाेंदविण्यात आला. त्यात ११ जणांना अटक करण्यात आली. यावेळी सहा हजार ३८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्याचबराेबर ढाबा मालकावर कारवाई करून, त्यास ताब्यात घेतले आहे. अटकेत असलेल्या ११ जणांना लातूरच्या न्यायालयात शुक्रवारी हजर केले असता, न्यायालयाने दंड ठाेठावला आहे.

ही कारवाई निरीक्षक आर. एम. बांगर, आर. एम. चाटे, दुय्यम निरीक्षक एल. बी. माटेकर, अमाेल शिंदे, स्वप्निल काळे, अ. ब. जाधव, सहायक दुय्यम निरीक्षक गणेश गाेले, ए. एल. कारभारी, जवान अनिरुद्ध देशपांडे, हणमंत मुंडे, संताेष केंद्रे, सुरेश काळे, श्रीकांत साळुंके, ज्याेतीराम पवार, वाहनचालक परळीकर यांच्या पथकाने केली.

दारूच्या साठ्यासह वाहन ताब्यात...
एका वाहनातून अवैधरीत्या दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे टेम्पाे वाटेतच अडवून झाडाझडती घेतली असता, ४७२ लिटर विदेशी दारू आणि ९४ लिटर बीअर असा साठा हाती लागला. या कारवाईत दाेन वाहने जप्त केली असून, जवळपास १० लाख ३४ हजार २३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

Web Title: Trafficking illegal liquor; 10 lakhs worth of goods seized in Latur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.