वेरुळ ते छ. संभाजीनगर प्रवासात परदेशी पाहुण्यांचे हाल; बसमध्ये जागा नाही, तासभर उभ्यानेच प्रवास
By संतोष हिरेमठ | Updated: February 24, 2026 19:06 IST2026-02-24T19:05:52+5:302026-02-24T19:06:08+5:30
जागतिक वारसा स्थळांच्या राजधानीत पर्यटन बसच गायब! साऊथ कोरियन पर्यटकाला स्मार्ट सिटी बसमध्ये बसण्यासाठी मिळेना जागा

वेरुळ ते छ. संभाजीनगर प्रवासात परदेशी पाहुण्यांचे हाल; बसमध्ये जागा नाही, तासभर उभ्यानेच प्रवास
छत्रपती संभाजीनगर : दुपारची वेळ… वेरुळहून छत्रपती संभाजीनगरकडे येणाऱ्या स्मार्ट सिटीच्या बसमध्ये परदेशी पर्यटक चढतात; पण काही मिनिटांतच सर्व सीट भरतात आणि परदेशी पाहुण्यांना उभ्यानेच प्रवास करावा लागतो. काही मिनिटे नाही, तासभर उभ्यानेच प्रवास. पर्यटनाच्या आनंदासाठी हा त्रास पर्यटक सहनही करतात. ही काही एका दिवसाची स्थिती नाही. जागतिक वारसा स्थळांचे प्रवेशद्वार असलेल्या शहरातील पर्यटन व्यवस्थेचे हे वास्तव रोज समोर येत आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये दररोज देश-विदेशातून पर्यटक दाखल होतात. अजिंठा आणि वेरुळ लेणी पाहण्यासाठी ते शहरात मुक्काम करतात. सर्वच परदेशी पर्यटक खासगी चारचाकीतून प्रवास करतात, असे नाही. अनेक परदेशी पाहुणे सार्वजनिक बससेवेचा शोध घेतात. शहरात आजघडीला वेरुळ, अजिंठ्यास जाण्यासाठी पर्यटन बस नाही. पर्यटनासाठी स्वतंत्र बससेवा नसल्याने त्यांना नियमित एसटी बसवरच अवलंबून राहावे लागते. त्याबरोबरच शहरातून ६ स्मार्ट सिटी बस या वेरुळपर्यंत धावतात. परंतु या बसमधून प्रवास करतानाही परदेशी पाहुण्यांना बहुतांशवेळी उभ्याने प्रवास करावा लागत आहे. कारण शहरात नियमित ये-जा करणाऱ्यांच्या संख्येमुळे परदेशी पाहुण्यांना जागा मिळणे अवघड होते. पर्यटन तज्ज्ञांच्या मते, स्वतंत्र ‘टुरिस्ट बस’ सुरू झाल्यास पर्यटकांचा अनुभव सुधारू शकतो.
एक तास उभे राहूनच प्रवास
साऊथ कोरियाहून आलेल्या पर्यटकाने स्मार्ट सिटी बसमधून वेरुळ ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास केला. बसमध्ये बसायला जागा मिळाली नाही. त्यामुळे या परदेशी पाहुण्याला तासभर उभे राहूनच प्रवास करावा लागला.
नियमित बससेवा
वेरुळ, अजिंठा मार्गावर नियमित बससेवा सुरू आहे. ई-बसही सुरू आहे. त्यातून पर्यटक प्रवास करू शकतात.
- संतोष घाणे, विभागीय वाहतूक अधिकारी, एसटी महामंडळ
वेगळी व्यवस्था नाही
वेरुळला स्मार्ट सिटी बस जाते. परंतु स्मार्ट सिटी बसमध्ये पर्यटकांसाठी वेगळी आरक्षण व्यवस्था नाही. काही ठराविक आरक्षण आहेत. महापालिकेकडून पर्यटन बस सुरू करण्यात येणार आहे.
- संजय सुपेकर, चीफ ऑपरेशनल मॅनेजर, स्मार्ट सिटी बस
वर्षभरातील पर्यटक संख्या (२०२४-२५) :
अजिंठा लेणी : भारतीय पर्यटक - ४,४०,३५६; परदेशी पर्यटक - १३,३७२
वेरूळ लेणी : भारतीय पर्यटक - १५,६३,८३७; परदेशी पर्यटक - १७,४६५
जिल्ह्यातील टुरिस्ट कॅबची संख्या : ४,९४४