मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; जिल्हा परिषद अध्यक्षांचे पंचनामा करण्याचे आदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 13:24 IST2021-06-11T13:22:28+5:302021-06-11T13:24:15+5:30
Rain in Aurangabad : भांबर्डा, दुधड, जयपूर, कुबेर गेवराई परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे

मुसळधार पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; जिल्हा परिषद अध्यक्षांचे पंचनामा करण्याचे आदेश
करमाड : औरंगाबाद तालुक्यातील भांबर्डा, दुधड, जयपूर, कुबेर गेवराई यासह अनेक गावांना बुधवारी ( दि.०९ ) झालेल्या मुसळधार पावसाचा मोठा फटका बसला आहे. समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूस नाली केलेली नसल्याने थेट शेतकऱ्यांच्या शेतात पाणी घुसून पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आज जिल्हा परिषद अध्यक्षा मीनाताई शेळके, तहसीलदार ज्योती पवार, तालुका कृषी अधिकारी हर्षदा जगताप, मंडळ अधिकारी देवलाल केदारे, कृषी सहाय्यक संजीव साठे, तलाठी वैशाली कांबळे, ग्रामसेवक अनिल केंद्रेकर, सभापती राजू घागरे यांच्या पथकाने नुकसानीची पाहणी केली.
तालुक्यातील भांबर्डा, दुधड, जयपूर, कुबेर गेवराई परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे जागोजागी शेतातील बंधारे फुटल्याने शेतातील कसदार माती वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.अनेक फळ बागेतही पाणी साचून त्या फळ बागेचेही मोठे नुकसान झाले असून ही अत्यंत भीषण परिस्थिती शेतकर्यांसमोर मोठे संकटच उभं राहिले आहे. काही ठिकाणी झालेल्या पावसाचे पाणी समृद्धी महामार्गाच्या व्यवस्थापकाच्या निष्काळजीपणामुळे चुकीच्या पद्धतीने तयार केलेल्या पुलामुळे शेतकऱ्यांच्या कांदा, जनावरांचे चारा, डाळींब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
फळबाग, कपाशी, कांदा, जनावरांचा चाराही वाहून गेल्याची कैफियत पाहणी दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्षा व अधिकार्यांच्या पथकासमोर शेतकऱ्यांनी मांडली. या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे व उद्यापर्यंत जिल्हा प्रशासनाला सादर करावी अशा सूचना जिल्हा परिषद अध्यक्षा शेळके यांनी दिल्या. तसेच शेतकऱ्यांनी या नुकसानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षांच्या हस्ते तहसीलदार ज्योती पवार यांना दिले. यावेळी भांबर्डा सरपंच भिमराव पठाडे, उपसरपंच सजन शिंदे, माजी उपसरपंच सुखदेव पठाडे, दौलत पठाडे, संताराम फुकटे, अंबादास पठाडे, सोमीनाथ जाधव, संतोष दिवटे, बळीराम काळे, मंडळाधिकारी देवलाल केदारे, तलाठी वैशाली कांबळे, कृषी सहाय्यक संजीव साठे, बनगाव सरपंच भास्करराव मुरुमे, सभापती राजू घागरे, संजय पठाडे, गजानन मते, परमेश्वर पठाडे,राजेंद्र पठाडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.