‘तोरण’ विहिरीत आग
By Admin | Updated: May 3, 2016 00:15 IST2016-05-03T00:08:07+5:302016-05-03T00:15:14+5:30
परंडा : जिवंत जलस्रोत असलेल्या येथील निजामकालीन तोरण विहिरीत वाढलेले गवत आणि साचलेल्या कचऱ्याला रविवारी संयकाळच्या सुमारास अचानक आग

‘तोरण’ विहिरीत आग
परंड्यातील घटना : नगर परिषदेची गाडी ‘फेल’
परंडा : जिवंत जलस्रोत असलेल्या येथील निजामकालीन तोरण विहिरीत वाढलेले गवत आणि साचलेल्या कचऱ्याला रविवारी संयकाळच्या सुमारास अचानक आग लागल्याने परिसरातील नागरिकांची एकच धावपळ उडाली. यावेळी पोलिस व पालिका प्रशासनाला याबाबत तातडीने कळविण्यात आले. परंतु, पोलिस घटनास्थळाकडे फिरकलेही नाहीत. तसेच पालिकेच्या अग्नीशमन दलाची गाडीही ‘फेल’ असल्याचे सांगत त्यांनीही हात वर केले. त्यामुळे खाजगी टँकरच्या मदतीने ही आग विझविण्यात आली.
परंडा शहरातील बसस्थानकाच्या उत्तर बाजूला ही निजामकालीन, विटांच्या बांधकामाची चिरेबंदी बारवरूपी विहीर आहे. परंतु, याच्या देखभालीकडे दुर्लक्ष झाल्यामुळे या विहिरीत मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. तसेच कचराही साचला आहे. रविवारी सांयकाळी सात वाजेच्या सुमारास अचानक येथे आग लागली. सदर विहिरीच्या जवयच दोन रुग्णालये आहेत. येथे रुग्णांची मोठी वर्दळ असते. त्यामुळे डॉ. मिस्कीन यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीन पोलिस व पालिका प्रशासनाला याची माहिती दिली. तसेच अग्नीशमन विभागाची गाडी पाठविण्याची विनंती केली. परंतु, वाहन नादुरूस्त असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. शेवटी आग वाढत असल्याचे लक्षात आल्यानंतर पालिकेतील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे शाखा अभियंता स्वप्नील ओहाळ काही कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी आले. त्यांनी १४०० लिटर क्षमतेचा खाजगी टँकर मागवून ही आग विझविली. (वार्ताहर)