आमदार रमेश बोरनारेंचा राजीनामा घेऊन कारवाई करावी; भाजप महिला आघाडी आक्रमक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2022 13:02 IST2022-02-21T13:01:09+5:302022-02-21T13:02:27+5:30
आमदार झाल्यापासून बोरनारे व कुटुंब, तसेच समर्थक पक्ष संघटनेत मस्तवालपणे वागत असून, गटबाजीच्या राजकारणाला खतपाणी घालत असल्याचा प्रकार जानेवारीत समोर आला.

आमदार रमेश बोरनारेंचा राजीनामा घेऊन कारवाई करावी; भाजप महिला आघाडी आक्रमक
औरंगाबाद : वैजापूरचे शिवसेना आ. रमेश बोरनारे व कुटुंबीयांना लोकसुरक्षेचा विसर पडला असून, ते मस्तवालपणे वागत आहेत. त्यामुळेच त्यांनी महिलेला मारहाण केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन आ. बोरनारे यांचा राजीनामा घेऊन कारवाई करावी, अशी मागणी करीत भाजप महिला आघाडीने या घटनेचा निषेध केला. सोमवारी भाजप महिला मोर्चाचे शिष्टमंडळ विशेष पोलीस महानिरीक्षकांना भेटून निवेदन देणार आहे.
१८ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांचा सत्कार केल्याने आ. बोरनारे यांच्यासह १० जणांनी चुलत भाऊ आणि त्यांच्या पत्नीला मारहाण केली. या घटनेचे राजकीय, तसेच सामाजिक पडसाद उमटू लागले आहेत. आमदार झाल्यापासून बोरनारे व कुटुंब, तसेच समर्थक पक्ष संघटनेत मस्तवालपणे वागत असून, गटबाजीच्या राजकारणाला खतपाणी घालत असल्याचा प्रकार जानेवारीत समोर आला. आजी व माजी, असे दोन गट तालुका पक्ष संघटनेत पडले. त्यातच कौटुंबिक वादातून मारहाणीच्या घटनांमुळे शिवसेनेची प्रतिमा मलिन करण्यात आ. बोरनारे व कुटुंब हातभार लावत आहे. या सगळ्याप्रकरणी पक्षप्रमुख काय करतात, याकडे लक्ष लागले आहे.
आ. बोरनारे यांना ३०७ (डी) कलम लावावे
भाजपचे शिष्टमंडळ दोन दिवसांपूर्वी वैजापूर पोलिसांना भेटले. आ. बोरनारे यांच्यावर ३०७ (डी) हे कलम लावण्यात आले पाहिजे. पोलिसांनी किरकोळ कलमे लावली आहेत. त्यांच्यावर राजकीय दबाव आहे. मारहाण झालेल्या महिलेला दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत ठाण्यात बसवून ठेवले. मेडिकलसाठी ३ तास ताटकळत ठेवले. हे सगळे असताना तिच्यावरच ॲट्राॅसिटीचा गुन्हा आमदाराच्या दबावातून १५ मिनिटांत कसा दाखल होतो? याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन आ. बोरनारे यांचा राजीनामा घेऊन त्यांचे सदस्यत्व रद्द केले पाहिजे. सोमवारी विशेष पोलीस महानिरीक्षकांची भेट घेणार आहोत.
-ॲड. माधुरी अदवंत, भाजप महिला मोर्चा, प्रदेश उपाध्यक्ष
वैजापुरात नागरिक सुरक्षित नाहीत
वैजापूर पोलिसांची भेट घेऊन मारहाण करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. लोकप्रतिनिधींकडून महिलांना मारहाण हाेत असल्यामुळे सामान्य नागरिक, महिलांमध्ये दहशत आहे. पोलीस दबावात असून ॲट्राॅसिटीचा गुन्हा शहानिशा न करता दाखल केला. ॲट्राॅसिटीचा हा गैरवापरच आहे.
याबाबत कारवाईच्या मागणीसाठी भाजप आग्रही राहील.
-अमृता पालोदकर, भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष