भाजपच्या गोटातून चमत्काराची भाषा
By Admin | Updated: April 26, 2015 01:01 IST2015-04-26T00:50:16+5:302015-04-26T01:01:33+5:30
औरंगाबाद : शिवसेनेने जर पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपदाची संधी दिली नाही, तर भाजपने २०१० साली जसे सभापतीपद सेनेकडून हिसकावले होते,

भाजपच्या गोटातून चमत्काराची भाषा
औरंगाबाद : शिवसेनेने जर पहिल्या अडीच वर्षांसाठी महापौरपदाची संधी दिली नाही, तर भाजपने २०१० साली जसे सभापतीपद सेनेकडून हिसकावले होते, त्याच धर्तीवर यावेळी महापौरपद सेनेकडून हिसकावण्यासाठी चमत्काराची भाषा करण्यास सुरुवात केली आहे. सर्वच पक्षांनी महापौरपदासाठी अर्ज भरला आहे. अजून युतीने विभागीय आयुक्तांकडे राष्ट्रीय लोकशाही आघाडीची नोंदणी केलेली नाही. तर एमआयएम, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यातही आघाडी होईल असे वाटत नाही. त्यामुळे ११३ नगरसेवकांपैकी महापौर होण्यासाठी ५७ हे संख्याबळ जरी हवे असले तरी संयुक्त गठबंधन न झाल्यामुळे सभागृहात ज्यांची संख्या जास्त त्यांचा महापौर होऊ शकतो. ४० नगरसेवक ज्या गटासोबत असतील त्या गटाचा महापौर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सेनेचे नगरसेवक लोणावळ्यात आहेत. ३५ इतके संख्याबळ असल्याचा दावा सेनेच्या गोटातून करण्यात आला.
विकास जैन, नंदकुमार घोडेले, राजू वैद्य, राजेंद्र जंजाळ हेदेखील महापौरपदाच्या स्पर्धेत होते. परंतु थेट तुपे यांचे नाव जाहीर करण्यात आल्याने नाराजी व्यक्त होत आहे. पालकमंत्री रामदास कदम, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी तुपे यांचे नाव लावून धरले. त्यामुळे महापौर निवडीसाठी त्यांचा शब्द मानला गेला.
सभापतीपद युती करारानुसार सेनेकडे होते. युतीने विकास जैन यांना उमेदवारी दिलेली असताना भाजपकडून राजू शिंदे यांनी अर्ज भरला. काँगे्रसच्या मदतीने त्यांनी सभापतीपद हिसकावले. यावेळीदेखील २०१० ची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, आ.अतुल सावे म्हणाले, चमत्कार नक्कीच घडेल. भाजपने महापौरपदाची मागणी केलेली आहे.
४खुल्या प्रवर्गासाठी महापौरपद असताना शिंदे यांना उमेदवारी देण्यामागे पक्षाचे काही गणिते आहेत. तसेच राठोड यांनादेखील काही समीकरणे जुळवून उमेदवारी दिली आहे. शिंदे यांना बहुमताची गोळाबेरीज करता आली तर ते शहराचे पहिले दलित महापौर म्हणून पुढे येतील. दरम्यान, शिंदे म्हणाले, बहुमताचा प्रश्नच येत नाही. महापौरपदासाठी तिरंगी लढत होणार आहे, त्यामुळे भाजपचाच पहिला महापौर होईल.