महापालिका, जि.प.त विजयी होण्यासाठी पक्षात जे येतील, त्या सर्वांना घ्या; एकनाथ शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 12:01 IST2025-09-09T12:01:02+5:302025-09-09T12:01:53+5:30
निवडणुकीपूर्वी एक ॲप पदाधिकाऱ्यांना देण्यात येईल. सर्वांनी त्याद्वारे मतदारांची माहिती संकलित करावी.

महापालिका, जि.प.त विजयी होण्यासाठी पक्षात जे येतील, त्या सर्वांना घ्या; एकनाथ शिंदे
छत्रपती संभाजीनगर : आता लोकसभा निवडणुकीशिवाय कोणत्याही मोठ्या निवडणुका नाहीत. त्यामुळे आता फक्त महापालिका, जि. प., नगरपालिकेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीत विजयी होण्यासाठी पक्षात जे येतील, त्यांना घ्या. मतदार याद्या बारकाईने चाळून आपले मतदार शोधा. उमेदवारी मिळणारा चांगला, न मिळालेला वाईट; असा मुद्दा मनात न धरता, जो उमेदवार असेल तो महायुतीचा असेल हे सूत्र समोर ठेवून निवडणुका लढण्याचे आवाहन करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे रणशिंग फुंकले.
जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख, तालुकाप्रमुखांपर्यंतच्या पदाधिकाऱ्यांना भरगच्च मेळावा शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी पालकमंत्री संजय शिरसाट, आ. अर्जुन खोतकर, आ. प्रदीप जैस्वाल, आ. विलास भुमरे, आ. संतोष बांगर, हेमंत पाटील आदींची उपस्थिती होती. निवडणुकीपूर्वी एक ॲप पदाधिकाऱ्यांना देण्यात येईल. सर्वांनी त्याद्वारे मतदारांची माहिती संकलित करावी. आपल्या मतदारांची नावे यादीत आहेत की नाहीत, हे तपासावे. असेही शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. मेळाव्यानंतर शिंदे यांनी विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर व महापालिका आयुक्त जी. श्रीकांत यांच्याकडून शहर पाणीपुरवठा योजना व इतर विकासकामांची माहिती जाणून घेतली.
जीआरमुळे ओबीसींवर अन्याय होणार नाही
विधान परिषद विरोधी पक्षनेता प्रकरणी पत्रकारांनी विचारले असता शिंदे म्हणाले, विरोधकांना जनतेने जागा दाखविली आहे. गाठीभेटी घेण्याचे काम विरोधकांचे आहे. आम्ही काम करतो. हैदराबाद गॅझेट व मनोज जरांगे यांच्या दसऱ्यानंतरच्या भूमिकेप्रकरणी विचारलेल्या प्रश्नावर शिंदे म्हणाले, इतर समाजांवर कुठलाही अन्याय होणार नाही. मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळतील. जीआरमुळे ओबीसींवर देखील अन्याय होणार नाही. एनडीएकडे बहुमत आहे, त्यामुळे उपराष्ट्रपतिपदी सी. पी. राधाकृष्णन् निवडून येतील, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तराप्रसंगी सांगितले.