नियम आणखी कडक करा, पण पुन्हा लाॅकडाऊन नकोच
By | Updated: November 29, 2020 04:06 IST2020-11-29T04:06:22+5:302020-11-29T04:06:22+5:30
योगेश पायघन औरंगाबाद : दिवाळीनंतर कोरोनाबाधित रुग्णसंख्येत व उपचारासाठी भरती रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. औरंगाबादसाठी पुढील तीन ...

नियम आणखी कडक करा, पण पुन्हा लाॅकडाऊन नकोच
योगेश पायघन
औरंगाबाद : दिवाळीनंतर कोरोनाबाधित रुग्णसंख्येत व उपचारासाठी भरती रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. औरंगाबादसाठी पुढील तीन महिने धोक्याचे असल्याचा इशारा मनपा आरोग्य विभागाकडून देण्यात आला. त्यावर व्यापारी, कामगार, डाॅक्टरांच्या संघटनेकडून नियम आणखी कडक करा; पण पुन्हा लाॅकडाऊन नको, असा सूर निघत आहे.
जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४३ हजार पार गेला आहे. गेल्या आठवडाभरापासून उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या हजाराकडे मार्गक्रमण करीत आहे, तर दुसऱ्या लाटेच्या संभाव्य धोक्यामुळे प्रशासनाकडून रस्ते, विमान, रेल्वे मार्गावर तपासणीला सुरुवात झाली आहे. मनपानेही विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची अंमलबजावणी वाढवली. आरोग्य विभाग आणि राज्य, केंद्र सरकारने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करून घ्या. दंडात्मक कारवाई वाढवा; पण हे करीत असताना पुन्हा लाॅकडाऊनचा निर्णय नकोच, असे मत डॉक्टर, व्यापारी व कर्मचारी संघटनांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले.
---
लाॅकडाऊन हा काही कोरोनावर इलाज नाही. अगोदरच व्यापाऱ्यांचा व्यापार आठ महिन्यांपासून ठप्प आहे. नागरिकांत जनजागृती मुंबई, पुण्याप्रमाणे करण्यासाठी व विना मास्क फिरणाऱ्यांवर मनपा आणि पोलीस प्रशासनाने दंडात्मक कारवाई करावी. व्यापारी सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, मास्कबद्दल ग्राहकांना सांगतील, व्यवसायात शासनाच्या सूचनांचे पालनही करतील. नियमांची अंमलबजावणी कडक व्हावी. मात्र, पुन्हा लाॅकडाऊन नकोच.
-जगन्नाथ काळे, व्यापारी महासंघ
--
लोकांमध्ये कोरोना प्रतिबंधासाठी अधिक जनजागृती करा. सूचनांचे पालन न करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई वाढविण्याची गरज आहे. खूपच गरज भासल्यास सायंकाळी लवकर मार्केट बंद करावे. मात्र, लाॅकडाऊन हा पर्याय ठरू शकत नाही. त्यामुळे आतापर्यंत सर्वच स्तरातील लोकांची आर्थिक परिस्थिती खालावली. आता पुन्हा तसे व्हायला नको.
-अजय शहा, प्रदेश वरिष्ठ उपाध्यक्ष, काॅन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स.
---
लाॅकडाऊन करणार नाही. मात्र, नियम अतिशय कडक राबविले जातील. केंद्र शासनाने सूचित केलेल्या चार राज्यांतून येणाऱ्या प्रवाशांची तपासणी जिल्ह्याच्या सीमांवर होणार आहे. त्यासंबंधीचा निर्णय लवकरच होईल. नागरिकांनी शासन आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करण्यासाठी उपाययोजना केल्या जातील. नागरिकांनी त्याचे पालन करावे.
-सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी
--
लाॅकडाऊनमुळे लोकांत अस्वस्थता निर्माण होते. त्याचे सर्वच घटकांना परिणाम भाेगावे लागतात. कोरोनाची दुसरी लाट जगभरात थैमान घालत आहे. आता कुटुंबाचे कोरोनापासून संरक्षण करणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागण्याची हीच वेळ आहे.
-डाॅ. संतोष रंजलकर, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, औरंगाबाद
--
दुसरी लाट रोखली पाहिजे. त्यासाठी शासनाने दिलेल्या सर्व सुरक्षिततेच्या सूचनांचे पालन प्रत्येक कारखान्यात, प्रत्येक कामगार करील. पहिल्या लाॅकडाऊनच्या आर्थिक संकटातून अद्याप कामगार सावरला नाही. ९० टक्के कामगारांना पगार नव्हे ॲडव्हान्स मिळाला. बोनस नाही. त्यात नोकर कपातीच्या संकटात पुन्हा लाॅकडाऊनचा पर्याय कोणत्याच कामगाराला परवडणारा नाही.
-प्रभाकर मते, मराठवाडा विभागीय सचिव, भारतीय कामगार सेना
--
पॉइंटर्स
--
कोरोनाचे एकूण रुग्ण - ४३,०६४
उपचारानंतर बरे झालेले रुग्ण - ४१,०२०
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - ९०१
कोरोनाचे बळी - १,१४३