आंबेडकरनगरात राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेचा झंझावात
By Admin | Updated: October 7, 2014 00:45 IST2014-10-07T00:18:55+5:302014-10-07T00:45:47+5:30
औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेने सोमवारी आंबेडकरनगरात धूम केली.

आंबेडकरनगरात राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेचा झंझावात
औरंगाबाद : काँग्रेसचे औरंगाबाद पूर्वचे उमेदवार राजेंद्र दर्डा यांच्या पदयात्रेने सोमवारी आंबेडकरनगरात धूम केली. पदयात्रेत कार्यकर्ते आणि महिला प्रचंड संख्येने सहभागी झाल्याने संपूर्ण आंबेडकरनगर काँग्रेसमय झाले होते, तसेच राजाबाजार, रोकडिया हनुमान कॉलनी आणि गजानननगर भागातही पदयात्रेला उदंड प्रतिसाद मिळला.
जळगाव रोडवरील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जयघोषाने पदयात्रा मोठ्या उत्साहात पुढे निघाली. फुलेनगर व टॉवरलाईन भागातील गल्ल्यांमध्ये राजेंद्र दर्डा यांच्यासह कार्यकर्त्यांनी घरोघरी जाऊन नागरिकांना मतदानाचे आवाहन केले. पदयात्रा आंबेडकरनगरात पोहोचल्यानंतर जळगाव रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला राजेंद्र दर्डा यांनी पुष्पहार अर्पण केला.
पदयात्रेदरम्यान जळगाव रोडवर जबरदस्त वातावरणनिर्मिती झाली. आंबेडकर चौकापासून पिसादेवी रोडमार्गे पदयात्रा आंबेडकरनगरातील गल्ल्यांमध्ये दाखल झाली. तेथे मोठ्या संख्येने कार्यकर्ते पदयात्रेत सामील झाले. ‘राजेंद्रबाबूजी आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है’च्या घोषणांनी संपूर्ण आंबेडकरनगर कार्यकर्त्यांनी दणाणून सोडले. यावेळी महिलांनीदेखील घोषणा देऊन कार्यकर्त्यांचा उत्साह वाढविला.
विविध भागांत पदयात्रेचे स्वागत
सोमवारी सकाळी ११ वाजता राजेंद्र दर्डा यांची पदयात्रा रोकडिया हनुमान कॉलनीत पोहोचली. फटाक्यांच्या आतषबाजीने व ढोलताशांच्या गजरात पदयात्रेचे स्वागत करण्यात आले. श्रीनिकेतन कॉलनीत ठिकठिकाणी महिलांनी राजेंद्र दर्डा यांना औक्षण करून विजयासाठी शुभेच्छा दिल्या, तसेच अनेक रहिवाशांनी राजेंद्र दर्डा यांचा पुष्पहार घालून सत्कार केला.
दुपारी १२ वाजता पदयात्रा सम्राट अशोक चौकातून मोंढ्यात पोहोचली. लक्ष्मण चावडी भागात दुकानदारांची भेट घेऊन राजेंद्र दर्डा यांनी मतदानाचे आवाहन केले. जाफरगेट भागात पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक दुकानदारांनी राजेंद्र दर्डा यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. जुना मोंढा, जाधव मंडी, झांबड हाईटस्, बांबू मार्केट भागात पुष्पवृष्टीने पदयात्रेचे स्वागत करण्यात आले.
राजाबाजार भागातील श्री संस्थान गणपती मंदिरात राजेंद्र दर्डा यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. त्यानंतर त्यांनी कुंवारफल्ली, गवळीवाडा भागात घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधला. राजाबाजार जैन मंदिरात जाऊन राजेंद्र दर्डा यांनी दर्शन घेतले. नवाबपुरा कॉर्नरवर पदयात्रेचा समारोप करण्यात आला. पदयात्रेत नगरसेवक, काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, युवक, महिला आणि समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गजानननगर, मातोश्रीनगरात जल्लोष
राजेंद्र दर्डा यांची पदयात्रा सायंकाळी ५ वाजता गजानननगर आणि मातोश्रीनगर भागात पोहोचली. पदयात्रेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. मातोश्रीनगर चौकातून पदयात्रेला सुरुवात झाली. ‘जय हो’च्या घोषणा देत कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. मातोश्रीनगर आणि गजानननगरातील प्रत्येक गल्लीमध्ये जाऊन राजेंद्र दर्डा यांनी रहिवाशांशी संवाद साधला. त्यांच्या सादेला नागरिकांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला. पदयात्रेदरम्यान ‘बाबूजी की जय हो’ या आशयाच्या रांगोळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गजानननगरात पदयात्रेचा समारोप करण्यात आला.
पदयात्रेच्या समारोपप्रसंगी आ. राजेंद्र दर्डा यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मी राज्याचा उद्योगमंत्री असताना डीएमआयसी हा प्रकल्प औरंगाबादेत आणला. परिणामी, औरंगाबादच्या युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यामुळे युवा मित्रांना आता रोजगारासाठी इतर शहरांमध्ये जाण्याची गरज नाही. प्रत्येकाच्या हाताला काम देण्यासाठी मी कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. समाजातील प्रत्येक घटकाला विकासाच्या प्रवाहात सामील करून घेण्याचे काम काँग्रेसने केले आहे. त्यामुळे महाराष्ट्राला सर्वांत पुढे ठेवण्यासाठी काँग्रेसशिवाय पर्याय नाही.