थरारक ! हॉटेलचालकावर चाकूहल्ला करून पळून जाणाऱ्या टोळीस पाठलाग करून पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 13:38 IST2021-05-10T13:28:27+5:302021-05-10T13:38:41+5:30
Crime News Aurangabad : रविवारी रात्री नांदराबाद येथील (कागजीपुऱ्याच्या अगोदर) हॉटेलचालक अक्षय बोडखे यांच्यासोबत या चौघाजणांची बाचाबाची झाली.

थरारक ! हॉटेलचालकावर चाकूहल्ला करून पळून जाणाऱ्या टोळीस पाठलाग करून पकडले
औरंगाबाद : हॉटेलचालकावर चाकूहल्ला करून तवेरा कारमधून पळून जाणाऱ्या गुन्हेगारांच्या टोळीला दौलताबादच्या पोलिसांनी पाठलाग करून माळीवाडा येथे पकडले. हा थरार रविवारी रात्री घडला असून जखमी हॉटेलचालकास पोलिसांनी उपचारासाठी घाटीत दाखल केले आहे.
साहिल हारुण सय्यद ऊर्फ भुऱ्या (१८, रा. राजनगर, मुकुंदवाडी), अशोक रावसाहेब लगोटे (२३, रा. राजनगर, मुकुंदवाडी), भारत सुदाम कांबळे (३७, रा. कैकाडी मोहल्ला, जुना जालना) व संकेत राजू खंडागळे (२२, रा. कबीरनगर, उस्मानपुरा) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
रविवारी रात्री नांदराबाद येथील (कागजीपुऱ्याच्या अगोदर) हॉटेलचालक अक्षय बोडखे यांच्यासोबत या चौघाजणांची बाचाबाची झाली. त्यानंतर त्यांनी चाकूने अक्षयवर हल्ला करून त्याच्याजवळील पैसे घेऊन ते पळून गेले. यामध्ये अक्षयच्या मांडीवर चाकूने वार केल्यामुळे तो गंभीर जखमी झाला.
दरम्यान, दौलताबाद ठाण्याचे उपनिरीक्षक रविकिरण कदम हे घाट गेटजवळ नाकाबंदी करीत होते. त्यावेळी तेथून सुसाट तवेरा कार निघून गेली. काहीवेळाने मागून दुचाकीवर पाठीमागे बसून अक्षय बोडखे आला व त्याने ही घटना सांगितली. क्षणाचाही वेळ न दवडता उपनिरीक्षक कदम यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह तवेरा कारचा (एमएच ०४- इएस- ३४६५) पाठलाग सुरू केला.
त्यावेळी माळीवाडा येथे नाकाबंदीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही कार अडवली व त्यातील चौघांच्याही मुसक्या आवळल्या. ही घटना खुलताबाद ठाण्याच्या हद्दीत घडल्यामुळे हा गुन्हा तिकडे वर्ग करण्यात आला आहे.यातील सय्यद साहिल ऊर्फ भुऱ्या हा बालपणापासून गुन्हेगारी सवईचा आहे. त्याच्यावर ३ गुन्हे दाखल असून अशोक लगोटे हा देखील सराईत गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्याविरुद्ध क्रांती चौक ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.