सोयगावात थरार ! दहा ते बारा जणांनी दगडफेक करत केला कुटुंबावर हल्ला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 23:46 IST2021-01-15T23:46:20+5:302021-01-15T23:46:50+5:30
हल्ल्यात कुटुंबातील तिघे गंभीर जखमी

सोयगावात थरार ! दहा ते बारा जणांनी दगडफेक करत केला कुटुंबावर हल्ला
सोयगाव : घरावर दगडफेक करून एका कुटुंबावर दहा ते बारा जणांच्या टोळक्यांने हल्ला केल्याची घटना जरंडी ( ता.सोयगाव ) येथील जुनातांडा भागात शुक्रवारी रात्री दहा वाजता घडली. हल्ल्यात तिघे जण गंभीर जखमी झाले असून अचानक झालेल्या या प्रकारामुळे गावात काही काळ तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी वेळीच घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणली.
जरंडी येथील जुनातांडा येथे तडवी कुटुंबाच्या घरावर रात्री १० वाजेच्या सुमारास दगडफेक करण्यात आली. यानंतर तडवी कुटुंबावर अज्ञात १० ते १२ जणांनी हल्ला केला. यात इसा तडवी( ४५),सांडू तडवी( २५) आणि बारक्या उर्फ मनोज तडवी गंभीर जखमी झाले आहेत. यानंतर हल्लेखोरांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सुदाम शिरसाठ यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. जखमींना उपचारासाठी पाचोरा जि.जळगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हा हल्ला कौटुंबिक वादातून झाला असल्याची शक्यता असून हल्लेखोर बाहेर गावातील असल्याची चर्चा आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.