एटीएम फोडणारे आणखी ३ जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2015 00:45 IST2015-12-30T00:25:06+5:302015-12-30T00:45:06+5:30
औरंगाबाद : एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांच्या टोळीतील फरार तिन्ही आरोपींना पोलिसांनी मंगळवारी सकाळी ६.३० वाजता जेरबंद केले. लोटाकारंजा भागात जिन्सी पोलिसांनी ही कारवाई केली

एटीएम फोडणारे आणखी ३ जेरबंद
औरंगाबाद : एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या पाच जणांच्या टोळीतील फरार तिन्ही आरोपींना पोलिसांनी मंगळवारी सकाळी ६.३० वाजता जेरबंद केले. लोटाकारंजा भागात जिन्सी पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान, सोमवारी पहाटे २.३० वाजेच्या सुमारास पाठलाग करून या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली होती. मंगळवारी जेरबंद केलेल्या तिघांना न्यायालयाने १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
मंगल खराटे (२२, रा. पिंपरी गवळी, ता. मोताळा, जि. बुलडाणा), दिनेशकुमार डब्ल्यूकुमार (२१, रा. लोटाकारंजा), मेहफूस खान लईक खान (१९, लोटाकारंजा), अशी मंगळवारी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत, तर सोमवारी बंटा राजेश चौधरी (२६) आणि भोला रोहित चंमार (२१, दोघेही ह.मु. लोटाकारंजा, रा. भांडूप, मुंबई) यांना अटक केली होती.
सहायक पोलीस निरीक्षक व्ही.एन. ठाकरे यांनी सांगितले की, अटकेतील पाचही आरोपी मूळचे उत्तर प्रदेश येथील असून, सध्या शहरात लोटाकारंजा येथे राहत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या टोळीकडून काही गंभीर चोरीच्या, एटीएम व बँक फोडीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, यातील काहींनी सिटीचौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुकानांमध्ये चोरी केल्याची कबुली दिली आहे.
पीसीआर मोबाईल कार क्र-२ ही आकाशवाणी चौकातून सोमवारी पहाटे जात असताना त्यांना काही संशयित लोक आढळले. पोलिसांनी आपली कार एसबीएच एटीएम सेंटरच्या दिशेने नेताच, पोलिसांना पाहून एटीएमबाहेर उभे असलेले तीन आरोपी ३० फूट उंचीवरून उड्या मारून पळून गेले, तर एटीएम फोडत असलेले दोन आरोपी एसबीएच इमारतीच्या वरच्या मजल्याच्या दिशेने जाऊ लागले. याप्रसंगी एका जणाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले, तर अन्य एक आरोपी इमारतीच्या थेट तिसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीमागे जाऊन लपला. त्यालाही बंदुकीच्या धाकावर पोलिसांनी जेरबंद केले. दोघांना ताब्यात घेतल्यानंतर मंगळवारी सकाळी लोटाकारंजा भागात ते राहत असल्याची माहिती मिळाली. त्यावरून फौजदार आर.एन. शेख, पोलीस नाईक ज्ञानगीर गिरी, पोकॉ. पंढरीनाथ जायभाये यांनी उर्वरित तिघांच्याही मुसक्या आवळल्या. मंगळवारी अटक केलेल्या तिघांना न्यायालयाने १ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिन्सी पोलिसांनी या पाच जणांकडून एटीएम फोडण्यासाठी वापरण्यात येणारे ड्रिल मशीन, कटर, स्क्रू ड्रायव्हर आणि इतर साहित्याची एक बॅग जप्त केली आहे. तसेच पानटपरी फोडून त्यातून चोरलेले सहा हजार रुपये आणि उर्वरित मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
४संपूर्ण तयारीनिशी आलेल्या या टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या असून, त्यांच्याकडून काही गंभीर गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी व्यक्त केली आहे.