डमी मीटर बसवून तीन लाखांची वीजचोरी; महावितरणच्या पथकाने केला गुन्हा दाखल
By साहेबराव हिवराळे | Updated: November 3, 2023 16:04 IST2023-11-03T16:04:13+5:302023-11-03T16:04:37+5:30
महावितरणच्या पथकाने विद्युत पुरवठा खंडित करून मीटर जप्त केले.

डमी मीटर बसवून तीन लाखांची वीजचोरी; महावितरणच्या पथकाने केला गुन्हा दाखल
छत्रपती संभाजीनगर : वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित असतानाही डमी मीटर बसवून तीन लाख १६ हजारांची वीजचोरी करणाऱ्यावर सिडको पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
महावितरणच्या शहागंज उपविभागाचे सहायक अभियंता विठ्ठल सपकाळ हे त्यांचे सहकारी नवाबपुरा शाखेचे सहायक अभियंता अभय अरणकल्ले, कनिष्ठ अभियंता संदीप पवार यांच्यासह १६ ऑक्टोबरला सकाळी तपासणी मोहिमेसाठी रहेमानिया कॉलनी, किराडपुरा येथे गेले. तेथे कायमस्वरूपी विद्युतपुरवठा बंद केलेल्या ग्राहकाच्या घरी तपासणी केली. या ठिकाणी वीज वापरकर्ता हशीम कुरेशी, इस्लाम कुरेशी याने अनधिकृतपणे मीटर बसविलेले आढळून आले. इतर पाच भाडेकरूंच्या खोल्यांमध्ये विद्युतपुरवठा घेऊन वीजचोरी करीत असल्याचे आढळून आले. महावितरणच्या पथकाने विद्युत पुरवठा खंडित करून मीटर जप्त केले.
आरोपीने १३४१४ युनिटची वीजचोरी करून महावितरणचे ३ लाख १६ हजार २४ रुपयांचे आर्थिक नुकसान केले. सहायक अभियंता विठ्ठल सपकाळ यांच्या फिर्यादीवरून हशीम कुरेशी इस्लाम कुरेशीवर सिडको पोलिस ठाण्यात भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये २६ ऑक्टोबरला गुन्हा दाखल करण्यात आला.