शाळांमध्ये पहिल्यांदाच सलग तीन दिवस झेंडावंदन; १३ ते १५ ऑगस्टपर्यंत दररोज तिरंगा झळकणार
By राम शिनगारे | Updated: August 12, 2023 19:30 IST2023-08-12T19:28:57+5:302023-08-12T19:30:59+5:30
केंद्र शासनाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

शाळांमध्ये पहिल्यांदाच सलग तीन दिवस झेंडावंदन; १३ ते १५ ऑगस्टपर्यंत दररोज तिरंगा झळकणार
छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाने सर्व प्रकारच्या शाळांमध्ये १३ ते १५ ऑगस्टदरम्यान दररोज शाळांमध्ये झेंडावंदन करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शनिवारी सकाळी एक आदेश काढला. त्यानंतर सायंकाळी तीन दिवस झेंडावंदन करण्याचा आदेश काढला आहे. त्यामुळे दिवसभर शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांमध्ये संभ्रमाचे वातावरण दिसून आले.
केंद्र शासनाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार केंद्र शासनाच्या मार्गदर्शन सुचना १० ऑगस्ट रोजी प्राप्त झाल्या. त्यानुसार ११ ऑगस्ट रोजी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेने राज्यभरातील सर्व शिक्षणाधिऱ्यांना आदेश काढला. या आदेशानुसार १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान राज्यातील प्रत्येक नागरिकांच्या घरावर तसेच सर्व शासकीय, निमशासकीय, खाजगी अस्थापना, सहकारी संस्थांच्या कार्यलयावर तिरंगा फडकाविण्याचे आदेश दिले. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक व माध्यमिकच्या शिक्षणाधिकारी शनिवारी (दि.१२) सकाळी आदेश काढीत १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान 'हर घर तिरंगा' उपक्रम राबवावा. तिनही दिवस ध्वजारोहण करण्याची गरज नाही. केवळ १५ ऑगस्ट रोजीच शाळांनी ध्वजारोहण करावे असे स्पष्ट केले. सकाळी १२ वाजेच्या सुमारास निघालेला हा आदेश सायंकाळी ६ वाजता बदलण्यात आला. नव्या आदेशानुसार १३ ते १५ या कालावधीत सर्व प्रकारच्या शाळांमध्ये ध्वजारोहण करण्याचे स्पष्ट करण्यात आले. या प्रकारामुळे शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापक गोंधळून गेले होते. दररोज ध्वजारोहण करायचे असेल तर त्याविषयीची नियमावलीही पाळावी लागणार आहे. जि.प.च्या दोन्ही शिक्षणाधिकारी सुधारित आदेश वरिष्ठांच्या सूचनेनुसार काढल्याची माहिती शिक्षण विभागातुन देण्यात आली.
विद्यापीठ, महाविद्यालयांमध्ये 'हर घर तिरंगा'
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाच्या संचालकांनी काढलेल्या आदेशानुसार विद्यापीठ अनुदान आयोगाने सर्व विद्यापीठांना पत्र पाठवले आहे. त्यानुसार आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत 'हर घर तिरंगा' हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालय, विभागांमधील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी १३ ते १५ या कालावधीत 'हर घर तिरंगा' उपक्रम राबवावा. राबविलेल्या उपक्रमांचे छायाचित्र संकेतस्थळासह सोशल मिडियावर टाकावे अशा सूचना दिल्या आहेत.