ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जावे: शिरसाट; माझ्या हाती शिंदेसेनेचाच झेंडा राहणार: जंजाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 12:38 IST2025-12-09T12:38:18+5:302025-12-09T12:38:35+5:30
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत राजेंद्र जंजाळ यांची सव्वा तास चर्चा

ज्यांना जायचे त्यांनी खुशाल जावे: शिरसाट; माझ्या हाती शिंदेसेनेचाच झेंडा राहणार: जंजाळ
छत्रपती संभाजीनगर : पालकमंत्री संजय शिरसाट आणि राजेंद्र जंजाळ यांच्यातील पक्षांतर्गत वादाची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी जंजाळ यांना मुंबईला बोलावून घेत सव्वा तास चर्चा केली. या पार्श्वभूमीवर शिरसाट यांनी ‘ज्याला जायचे त्याने खुशाल जावे’, असा टोला जंजाळ यांना लगावला होता. जंजाळ यांनी ‘मी कोठेही जाणार नाही, शिंदेसेनेचाच झेंडा माझ्या हाती राहणार असल्याचे’ सोमवारी लोकमतला सांगितले.
महापालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेनेत राजकीय हालचालींना वेग आला आहे. उद्धवसेनेतील अनेक माजी महापौरांसह नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. विधानसभा निवडणुकीत ज्यांनी शिंदेसेनेविरोधात काम केले, त्यांना पक्षात घेऊ नका, अशी भूमिका जंजाळ यांनी घेतली होती. मात्र, पालकमंत्री शिरसाट यांच्या पुढाकाराने अनेकांना प्रवेश देण्यात आला. त्यांच्यापैकी बहुतेक पदाधिकाऱ्यांना पक्षाकडून नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकीदरम्यान जबाबदारी देण्यात आली होती. ही जबाबदारी सोपविताना जंजाळ यांना दूर ठेवण्यात आले होते. महापालिका निवडणुकीची उमेदवारी देताना पक्षातील इच्छुक जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलून आयात पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देण्याची शक्यता लक्षात घेऊन जंजाळ यांनी शिरसाट मनमानी करतात, ते आपल्याला मुद्दाम डावलत असल्याचा आरोप केला होता.
जंजाळांच्या आरोपाला उत्तर देताना शिरसाट यांनी त्यांना जिल्हाप्रमुख आपणच केल्याचे सांगितले. त्यांना ‘ज्या पक्षात जायचे तेथे जरूर जावे’ असे सांगून एक प्रकारे बाहेरचा रस्ता दाखविला. मात्र, जंजाळ यांनी पक्षप्रमुख शिंदे यांची भेट घेतल्यानंतर ‘आपण कोठेही जाणार नाही, शिंदेसेनेचाच झेंडा आपल्या हातात असेल’, असे सांगितले.