ही दोस्ती तुटायची नाय… तब्बल ४० वर्षांची साथ; मृत्यूनंतरही ते मैत्रीच्या मंदिरात सोबतच
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2025 07:31 IST2025-08-03T07:31:04+5:302025-08-03T07:31:26+5:30
डाॅ. किशन धाबे हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रौढ शिक्षण व पदव्युत्तर पदवी विभागाचे संचालक होते तर माधवराव बोर्डे हे संत कबीर शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते...

ही दोस्ती तुटायची नाय… तब्बल ४० वर्षांची साथ; मृत्यूनंतरही ते मैत्रीच्या मंदिरात सोबतच
संतोष हिरेमठ
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरपासून अवघ्या १५ किमी अंतरावर टाकळी कदीम (ता. गंगापूर) हे एक असे ठिकाण, जे आज अतूट मैत्रीचा संदेश देते. श्रद्धेचा प्रत्यय देणारे हे स्थळ आहे. या ठिकाणी दोन मित्रांच्या आठवणी जपण्यासाठी आणि नि:स्वार्थ मैत्रीचा संदेश देणारे आगळेवेगळे ‘मैत्रीचे मंदिर’ उभारण्यात आले आहे. मैत्रीचीही नाळ असू शकते याची प्रचिती येथे येते. दिवंगत डॉ. किशन सदाशिव धाबे आणि माधवराव बोर्डे या २ मित्रांचे हे मंदिर आहे.
प्रेरणा मिळावी म्हणून उभारले मंदिर -
डाॅ. किशन धाबे हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रौढ शिक्षण व पदव्युत्तर पदवी विभागाचे संचालक होते तर माधवराव बोर्डे हे संत कबीर शिक्षण संस्थेचे संचालक म्हणून कार्यरत होते.
दोघांचीही मैत्री आयुष्यभर इतकी घट्ट राहिली की, मृत्यूनंतरही या मंदिराच्या रूपाने दोघे एकत्र आहेत. संगमरवरी मंदिरात दोघांच्या मूर्ती विराजमान आहेत. नव्या पिढीला मैत्रीविषयी प्रेरणा मिळावी, याच भावनेतून डाॅ. हर्षल धाबे यांनी वडील डाॅ. किशन धाबे आणि माधवराव बोर्डे यांच्या मैत्रीचे मंदिर उभारले.
मुलांमध्येही घट्ट मैत्री
धाबे आणि बोर्डे यांच्या मुलांमध्येही अगदी घट्ट मैत्री आहे. धाबे आणि बोर्डे यांचे मित्र नियमितपणे या मंदिराला भेट देऊन आठवणींना उजाळा देतात.
दोघांचीही ४० वर्षे मैत्री होती. दोघांनी गरिबीची जाणीव ठेवली व जनहित साधत, निःस्वार्थ जीवन व्यतीत केले. अनेक विद्यार्थ्यांना घडविले. ग्रामीण भागातून शहरात शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी छत्रपती संभाजीनगर येथे येतात. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, याच भावनेने माझ्या शेतात मैत्रीचे मंदिर उभारले.
डाॅ. हर्षल धाबे