संतापजनक! घरात घुसून लावला आईच्या गळ्याला चाकू, मुलीला ओढून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न
By सुमित डोळे | Updated: February 6, 2024 14:50 IST2024-02-06T14:45:34+5:302024-02-06T14:50:02+5:30
पाच दिवसांत चौथ्यांदा महिलेवर हल्ला; कश्यप समर्थकाचे पुंडलिकनगरमध्ये संतापजनक कृत्य

संतापजनक! घरात घुसून लावला आईच्या गळ्याला चाकू, मुलीला ओढून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न
छत्रपती संभाजीनगर : बँकेच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या २० वर्षीय मुलीचा पुंडलिकनगर मधे कुख्यात गुन्हेगारांच्या टोळीने पाठलाग केला. रात्री तिच्या घरात घुसून आई, मुलीच्या तोंडावर धूर सोडत अश्लील प्रकार केले. आईच्या गळ्याला चाकू लावून मुलीला ओढून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला. पुंडलिकनगर, शिवाजीनगर मधे गेल्या पाच दिवसांमध्ये महिलांसोबत गंभीर प्रकार घडण्याची ही सलग चौथी घटना आहे. त्यामुळे अवैध व्यवसायांच्या कारवाईत मग्न असलेल्या पोलिसांचे मात्र टवाळखोर, गुन्हेगारांवरील नियंत्रण सुटल्याची संतापजनक प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटत आहे.
आई, लहान भावासह राहणाऱ्या २० वर्षांच्या राखीच्या (नाव बदलले आहे) वडिलांचे आठ महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. ४ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता ती बँक भरतीच्या क्लासेसवरून शिवाजीनगरमधून घराकडे पायी जात असताना कुख्यात गुन्हेगार साईनाथ ऊर्फ पिन्या ऊर्फ प्रतीक गणेश खडके (२१, रा. भारतनगर) याने तिचा पाठलाग सुरू केला. तरुणीने आरडाओरड केल्याने त्याने शिवीगाळ करून पळ काढला. या घटनेमुळे राखी घाबरून गेली होती. रात्री ११.१५ वाजता पिन्याने पुन्हा दोन साथीदारांसह राखीच्या घरात बळजबरीने प्रवेश केला. बेधुंद नशेत असलेल्या गुंडांनी दोघींच्या तोंडावर धूर सोडत राखीच्या आईच्या गळ्याला चाकू लावला. दोघींचाही खून करतो, असे म्हणत त्याने राखीला जवळ ओढले. गैरप्रकार करण्याचा प्रयत्न केला. दोघींचा आरडाओरड ऐकून स्थानिकांनी धाव घेतल्यानंतर गुंडांनी पळ काढला. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पुंडलिकनगर पोलिसांनी धाव घेत पिण्याला रात्रीतून अटक केली.
१५ दिवसांपूर्वीच कारागृहातून बाहेर
पिन्या ऊर्फ प्रतीकवर आत्तापर्यंत पुंडलिकनगर, सातारा ठाण्यात विनयभंग, खुनाचा प्रयत्न, गंभीर मारहाण, चोरीचे ५ गंभीर गुन्हे आहेत. परिसरातील दुर्लभ कश्यपच्या समर्थकांच्या टोळीचा तो सदस्य असून सोशल मीडियावर खुलेआम पोलिसांना आवाहन देतो. ४ जानेवारी, २०२३ रोजी त्याला एमपीडीए अंतर्गत हर्सुल कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले होते. त्यातून बाहेर पडताच पुन्हा गुन्हेगारी सुरू केली.
निवेदन देऊन कंटाळले
भारतनगर, शिवाजीनगर, पुंडलिकनगर मधील गावगुंडांच्या दादागिरीला कंटाळून नागरिकांनी वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र, अद्यापही त्याला कोणीही गांभीर्याने घेतले नाही. स्मार्टसिटीच्या कॅमेऱ्यात धिंगाणा कैद होऊनही कारवाई होत नसेल तर ते कॅमेरे काय कामाचे, असाही प्रश्न आता स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
गुन्हेगारांची खुलेआम गुंडगिरी
३० जानेवारी - दुपारी २.०० वाजता गुन्हेगार पवन जैस्वालने शस्त्रासह मुलीच्या घरात घुसून घराची तोडफोड.
३१ जानेवारी - रात्री ९.३० वाजता शतपावली करणाऱ्या ४१ वर्षीय महिलेवर रेहान शहा (१९) कडून मारहाण.
२ जानेवारी - रात्री ८.३० वाजता एका गुन्हेगारांच्या टोळीने एका महिलेच्या घरातील सामान रस्त्यावर फेकत धिंगाणा घातला.
४ जानेवारी - रात्री ११.१५ वाजता २० वर्षीय तरुणीच्या घरात घुसून गळ्याला चाकू लावला.