औरंगाबादमध्ये खराब वातावरणातही विमानांचे होईल सुरक्षित लँडिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 19:29 IST2020-09-17T19:29:11+5:302020-09-17T19:29:37+5:30
जमिनीवर यंत्रणेसह लँडिंगसाठी अतिरिक्त पर्याय

औरंगाबादमध्ये खराब वातावरणातही विमानांचे होईल सुरक्षित लँडिंग
औरंगाबाद : चिकलठाणा विमानतळावरविमानांच्या लँडिंगसाठी सॅटेलाईटवर आधारित यंत्रणा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे दाट धुके, पाऊस यासह खराब वातावरणात विमानांचे लँडिंग सुरक्षितरीत्या होण्यास मदत होईल, असे विमानतळाचे सहायक महाप्रबंधक (एटीसी) विनायक कटके यांनी सांगितले.
खराब वातावरणामुळे अनेकदा औरंगाबादला येणारी विमाने अन्य विमानतळांवर पाठविण्याची वेळ ओढावल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा घडल्या आहेत. विमानतळावर सध्या जमिनीवरील ‘इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टिम’ (आयएलएस)च्या मदतीने विमाने उतरतात; परंतु आता त्याच्या सोबतीला सॅटेलाईटवर आधारित यंत्रणाही विमानतळावर उपलब्ध झाली आहे. यासाठी ‘डीजीसीए’कडून परवानगी मिळाली आहे.
सॅटेलाईवर आधारित असलेली ही यंत्रणा जीपीएस प्रणालीवर आधारित आहे. यामुळे विमानाची उंची किती आहे, सहज लक्षात येते. त्यामुळे जमिनीवरील यंत्रणेची मदत न घेता विमान धावपट्टीवर सुरक्षितरीत्या उतरविता येते. त्यामुळे विमानाचे आगमन अधिक सुरक्षित होण्यास मदत होईल, असे विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. हिवाळ्यात धुक्यामुळे दृश्यमानता कमी होते. त्यातून विमानांचे वेळापत्रक कोलमडते; परंतु आता विमानतळ धुक्याच्या अडचणींचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञान व सामग्रीदृष्ट्या सुसज्ज झाले आहे.
आपत्कालीन परिस्थितीत मदत
आपत्कालीन परिस्थितीत विमानतळावर अधिकारी-कर्मचारी नसतील अथवा विमानतळावरील यंत्रणेत काही बिघाड झाला, तरीही सॅटेलाईट बेसवर आधारित असलेल्या या यंत्रणेद्वारे विमान धावपट्टीवर उतरविणे शक्य होते, असे विनायक कटके यांनी सांगितले.