'त्या' तलाठ्याच्या विशाखा समितीकडे होत्या तक्रारी; पोलिसांनी महसूल प्रशासनाकडून घेतली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 19:52 IST2021-12-01T19:50:08+5:302021-12-01T19:52:39+5:30
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये अप्पर तहसीलअंतर्गत येणाऱ्या अधिकारी - कर्मचारी मिळून १३ जणांची नावे लिहून ठेवली होती.

'त्या' तलाठ्याच्या विशाखा समितीकडे होत्या तक्रारी; पोलिसांनी महसूल प्रशासनाकडून घेतली माहिती
औरंगाबाद : अप्पर तहसीलअंतर्गत काम करणाऱ्या तलाठी लक्ष्मण बोराटेचे आत्महत्या प्रकरण वेगळ्या वळणावर पोहोचले आहे. त्यांच्या व लिपिक डी. एस. राजपूत यांच्या विरोधात संजय गांधी योजना शहर कार्यालयातील सहकारी महिला कर्मचाऱ्यांनी विशाखा समिती व पोलीस आयुक्तांकडे मध्यंतरी तक्रारी केल्या होत्या. त्या तक्रारींची माहिती पोलिसांनी मंगळवारी घेतली आहे.
दोन दिवसांपूर्वी बोराटे यांनी आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीमध्ये त्यांनी अप्पर तहसीलअंतर्गत येणाऱ्या अधिकारी - कर्मचारी मिळून १३ जणांची नावे लिहून ठेवली होती. या सगळ्या प्रकारामुळे महसूल प्रशासन हादरले असून पोलिसांनी या प्रकरणात तपास सुरू केला आहे.
बोराटे अप्पर तहसीलमध्ये रुजू होण्यापूर्वी संजय गांधी योजना विभागात कार्यरत होते. त्यांच्या व राजपूतच्या विरोधात १६ मार्च २०१८ रोजी एका महिला कर्मचाऱ्याने तहसीलदार, विशाखा समिती व पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली होती. सिटी चौक पोलिसांनी त्या तक्रारीच्या अनुषंगाने तत्कालीन तहसीलदार तायडे यांच्याकडून माहितीदेखील मागविल्याची नोंद असल्याचे समोर आले आहे. महसूल कर्मचाऱ्यांनी ही सगळी माहिती पोलिसांना दिली आहे. त्या तक्रारीमध्ये बोराटे आणि राजपूत यांच्या नावाचा उल्लेख आहे. अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांनी सांगितले, पोलीस तपास करीत आहेत. मी रुजू झाल्यानंतर बोराटे माझ्याकडे एक-दोन वेळेस आले होते. काही जुन्या तक्रारी देखील त्यांच्या विरोधात होत्या. त्याची माहिती पोलीस घेत असल्याचे कानावर आले आहे.
आता पोलीस काय करणार ?
पोलीस सर्व बाजूंनी तपास करीत आहेत. बोराटे यांच्यावर काही वैद्यकीय उपचार सुरू होते का, कार्यालयातील वागणूक आदी बाबींची माहिती घेत आहेत. महसूल प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचारी मिळून १३ जणांची नावे बोराटे यांनी सुसाईड नोटमध्ये लिहून ठेवली आहेत. त्यामुळे पोलीस या प्रकरणात कशी भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.