शंभर गावे २६२ वाड्यांवर टंचाई
By Admin | Updated: August 12, 2014 01:56 IST2014-08-12T00:45:08+5:302014-08-12T01:56:09+5:30
बीड: सततच्या दुष्काळामुळे पाण्याचे उद्भव दिवसेंदिवस कमी होत आहेत. गत तीन वर्षांपासून पावसाने पाठ फिरविल्याने राज्यकर्त्यांपासून ते प्रशासनापर्यंत

शंभर गावे २६२ वाड्यांवर टंचाई
बीड: सततच्या दुष्काळामुळे पाण्याचे उद्भव दिवसेंदिवस कमी होत आहेत. गत तीन वर्षांपासून पावसाने पाठ फिरविल्याने राज्यकर्त्यांपासून ते प्रशासनापर्यंत सर्वांच्या समोर टंचाईवर मात करण्याचे आवाहन उभा ठाकले आहे. आज स्थितीत आष्टी, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यात १०९ गावे तर ७२ वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
पावसाळा सुरू होऊन अडीच महिन्याचा कालावधी लोटला तरी बीड जिल्ह्यात पिके जगण्यापुरता देखील पाऊस झालेला नाही. पिण्याच्या पाण्याची टंचाई आष्टी, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यात भेडसवू लागली आहे.
आज स्थितीत या तीन तालुक्यांत जिल्हा प्रशासनाने ५९ बोअर तर ३७ विहिरी पिण्याच्या पाण्यासाठी अधिग्रहीत केल्या आहेत. यापुढील काळात पाऊस पडला नाही तर ज्या बोअर व विहिरींना पाणी आहे. त्या अधिग्रहीत कराव्या लागणार असल्याचे जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांनी सांगितले. यापुढे पाऊस झाला नाही तर ज्या ठिकाणचे पाण्याचे उद्भव प्रशासनाने अधिग्रहीत केले आहेत. ते देखील आटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे येणाऱ्या काळात नागरिकांना पिण्याचे पाणी पुरवठा करण्याची समस्या निर्माण होऊ शकते. यासाठी आतापासूनच उपाययोजना करणे आवश्यक आहे.
आष्टी, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यातील १ लाख ७१ हजार २८६ नागरिकांना प्रशासन पिण्याचे पाणी टँकरद्वारे पुरवठा करत आहे. वरील तालुक्यातील लघु व मध्यम प्रकल्प भरण्याइतका पाऊस पुढील आठ-दहा दिवसात नाही पडला तर गाव व वाड्यांच्या संख्येत दुप्पटीने भर पडणार असल्याचे चित्र सध्या तरी पहावयास मिळत आहे. (प्रतिनिधी)