'गावात पाणी नाही म्हणून इथे जेवण केल, आता पाणी द्या' परभणीकरांचे गोदावरी महामंडळात आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 18:00 IST2019-05-17T18:00:53+5:302019-05-17T18:00:53+5:30
दुष्काळात पाणी मिळणार नाही तर तुमचे नियोजन काय कामाचे असा संतप्त सवाल आंदोलकांनी केला

'गावात पाणी नाही म्हणून इथे जेवण केल, आता पाणी द्या' परभणीकरांचे गोदावरी महामंडळात आंदोलन
औरंगाबाद : अखिल भारतीय किसान सभाच्या परभणीतील जायकवाडी पाणी हक्क संघर्ष समितीचे ७ ते ८ कार्यकर्ते सकाळी ११ वाजता गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अ.प्रा.कोहिरकर यांना जवाब विचारण्यासाठी आले. कार्यकर्त्यांनी आपल्याकडील दशम्या काढून त्या कोहिरकरांच्या टेबलावर ठेवल्या व खाण्यास सुरुवात केली. त्यानंतर संघर्ष समितीचे विलास बाबर म्हणाले की, 'गावात पाणी नाही म्हणून आम्ही येथे जेवण केले, आता पाणी द्या'. लगेच शिपायाने पाण्याच्या बाटल्या आणून दिल्या.
पाणी पिल्यानंतर समितीच्या कार्यकर्त्यांनी कोहिरकर यांच्यावर प्रश्नांचा भिडमार केला. दुष्काळात ग्रामीण जनतेला व जनावराला पाणी मिळत नसेल तर जनेतेन व पशुपालकांनी काय करावे. १६ मे २०१६ रोजी धरणात ५५१ दलघमी पाणीसाठा होता. १६ मे २०१९ रोजी ६२५ दलघमी पाणीसाठी आहे. दुष्काळाची परिस्थिती लक्षात घेता संपूर्ण धरणातील पाणी परभणीला द्या असे आम्ही म्हणत नाही. तर त्यातील औरंगाबाद, जालना, बीड, परभणी जिल्ह्यात पाणी द्या, दुष्काळात पाणी मिळणार नाही तर तुमचे नियोजन काय कामाचे असा संतप्त सवाल आंदोलकांनी यावेळी केला. सकारात्मक अहवाल पाठवून पावसाळ्यापूर्वी डाव्या कालव्यात पाणी सोडा नसता पुन्हा आंदोलन करु असे म्हणत कार्यकर्ते कॅबीनमधून बाहेर पडले.