नेतृत्व बदलण्याचा प्रश्नच येत नाही; फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 02:37 PM2019-11-18T14:37:30+5:302019-11-18T14:40:09+5:30

रावसाहेब दानवे यांचा पुनरूच्चार

There is no question of changing leadership; Fadanavis will be the Chief Minister again | नेतृत्व बदलण्याचा प्रश्नच येत नाही; फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार

नेतृत्व बदलण्याचा प्रश्नच येत नाही; फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होणार

googlenewsNext
ठळक मुद्दे बाळासाहेब ठाकरे असते तर ही वेळच आली नसतीसत्ता समीकरणाच्या सर्व प्रश्नांना बगल दिली. 

औरंगाबाद : राज्यात भाजपचेच सरकार सत्तेवर येणार आणि माजी मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस हेच पुन्हा मुख्यमंत्री होणार, असा पुनरुच्चार  केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना पुन्हा केला. फडणवीस यांचे नेतृत्व बदलण्याचा प्रश्नच येत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.     

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आज असते, तर महायुतीबाबत ‘ही वेळ’ आलीच नसती, असे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सांगून  राज्यात भाजपचेच सरकार येणार, हे ठामपणे सांगितले. सत्तेचे समीकरण कसे जुळणार, शिवसेना सोबत येणार काय, भाजपच्या संपर्कात इतर पक्षांचे आमदार आहेत काय? याबाबत थेट उत्तर देणे त्यांनी टाळले. मंगळवार किंवा बुधवारपर्यंत चित्र स्पष्ट होणार असल्याचे सूचक वक्तव्य करून त्यांनी सत्ता समीकरणाच्या सर्व प्रश्नांना बगल दिली. 

केंद्रीय राज्यमंत्री दानवे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी शिवसेना- भाजप युतीची मोट बांधली. युतीमध्ये ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र ठाकरे आणि महाजन यांनीच निश्चित केलेले आहे. त्याच सूत्राआधारे १९९५ मध्ये राज्यात शिवसेना- भाजप युतीचे सरकार आले होते. शिवसेनेकडे जास्त आमदार असल्याने मनोहर जोशी व नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले. त्या सूत्राचा २०१९ च्या विधानसभा निवडणुकीतदेखील विचार होऊन मुख्यमंत्रीपद भाजपला मिळणे अपेक्षित होते. मात्र, निवडणूक निकाल लागले त्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमच्या समोर सर्व पर्याय खुले असल्याचे वक्तव्य करून मुख्यमंत्रीपदाचा आग्रह धरला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि ठाकरे या दोघांमध्ये मातोश्रीवर जे बोलणे झाले होते, ते पत्रपरिषद घेऊन सांगितले होते. सत्तेचे समान वाटप होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते; परंतु त्यावेळी मुख्यमंत्रीपद वाटपाबाबतही समान वाटपाचा विचार झालेला नव्हता; परंतु ठाकरे यांच्या भूमिकेमुळेच राज्यात अस्थिरता निर्माण झाली. 

बाळासाहेब ठाकरे आज हयात असते, तर ही वेळच आली नसती. महाजनादेश यात्रेमुळे महायुतीला जनादेश मिळाला. त्याचा आदर दोन्ही पक्षांनी करावा, असे आवाहन दानवे यांनी केले. फडणवीस यांच्या ५ वर्षांच्या कार्यकाळात राज्यात भरपूर विकासकामे झाली. दोन वेळा दुष्काळ पडला. मराठा, धनगर समाज व शेतकऱ्यांचे आंदोलनही झाले; परंतु फडणवीस यांनी ती परिस्थिती संयमाने हाताळली. मुख्यमंत्री म्हणून फडणवीस हे यशस्वी ठरले. त्यामुळे त्यांचे नेतृत्व बदलण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यात पुन्हा आमचेच सरकार येणार असल्याचा पुनरुच्चार दानवे यांनी केला. यावेळी मराठवाडा विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. भागवत कराड, नगरसेवक प्रमोद राठोड यांची उपस्थिती होती. 
केंद्रीय पथकाच्या पाहणीनंतर शेतकऱ्यांना मदत 

अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तत्पूर्वी, राज्यपालांनी शेतकऱ्यांना प्राथमिक स्वरूपाची आर्थिक मदत जाहीर केली. नुकसानीच्या तुलनेत ही मदत तुटपुंजी असली तरी शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. राज्याचा एकूण नुकसानीचा आकडा निश्चित झाल्यानंतर केंद्रीय पथक पाहणीसाठी येईल. पथकाच्या पाहणीनंतर केंद्राची शेतकऱ्यांना मदत मिळेल, तसेच राज्यपालांनी विमा कंपन्या आणि जिल्हाधिकाऱ्यांना पंचनाम्यांचे चावडी वाचन करण्याचे आदेश दिले आहेत. जेवढे नुकसान झाले, तेवढी भरपाई देण्याची तरतूद नसते, असेही दानवे यांनी स्पष्ट केले.

Web Title: There is no question of changing leadership; Fadanavis will be the Chief Minister again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.