जिओ, फेबसुकच्या नोडल अधिकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे समन्स; काय आहे प्रकरण?
By सुमित डोळे | Updated: July 29, 2023 12:26 IST2023-07-29T12:21:08+5:302023-07-29T12:26:02+5:30
सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून वारंवार माहिती मागूनही जिओ व फेसबुक (मेटा) कडून प्रतिसाद मिळाला नाही.

जिओ, फेबसुकच्या नोडल अधिकाऱ्यांना छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे समन्स; काय आहे प्रकरण?
छत्रपती संभाजीनगर : दोन महिन्यांपूर्वी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पांडेय यांचे कुटुंबाच्या छायाचित्रांसह बनावट फेसबुक खाते तयार करून आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला होता. सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यापासून वारंवार माहिती मागूनही जिओ व फेसबुक (मेटा) कडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे सायबर पोलिसांनी गुरुवारी दोन्ही कंपन्यांच्या मुख्य नोडल अधिकाऱ्यांनाच १ ऑगस्ट रोजी स्वत: चौकशीसाठी प्रत्यक्ष उपस्थित राहा, अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असे समन्स बजावले आहे.
मे महिन्यात पांडेय यांना त्यांच्या नावे फेसबुकवर बनावट खाते उघडल्याचे निदर्शनास आले. त्यावर पांडेय यांचे कुटुंबातले छायाचित्र देखील होते. त्यांच्या एका नातेवाइकाला त्याद्वारे पैशांची मागणी झाली. तर, एका नातेवाइकाला फर्निचर विकण्याचा बहाणा करून फसवण्याचा प्रयत्न केला. १ जून रोजी त्यांच्या तक्रारीवरून सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक प्रवीणा यादव यांनी याप्रकरणी दोन्हीला तांत्रिक तपासासाठी माहिती मागवली होती. त्यासाठी सलग दोन महिने पाठपुरावा केला. सातत्याने मेल करून राज्याच्या नोडल अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. मात्र, एकदाही प्रतिसाद मिळाला नाही. वरिष्ठांना त्यांनी हा प्रकार कळवला. मग ठोस भूमिका घेण्याचे ठरले. दोन्ही कंपन्यांच्या प्रमुखांच्या मुख्य नोडल अधिकाऱ्यांनाच सीआरपीसी १६० नुसार नोटीस बजावली. त्यात १ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सायबर पोलिस ठाण्यात स्वत: प्रत्यक्ष चौकशी व जबाबासाठी हजर राहण्याची ताकीद देण्यात आली आहे. शिवाय, उपस्थित न राहिल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. बड्या समूहांना असे समन्स पाठवण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.