१४ गावात घरांवर आकाश कंदील नाही; शेतकऱ्यांच्या दिवाळीला कोरोना, नैसर्गिक आपत्तीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 05:59 PM2020-11-14T17:59:44+5:302020-11-14T18:05:55+5:30

दिवाळीच्या दिवशीही शेतकऱ्यांनी धरली शेताची वाट 

There are no sky lanterns on houses in 14 villages; Corona, a natural disaster hit farmers' Diwali | १४ गावात घरांवर आकाश कंदील नाही; शेतकऱ्यांच्या दिवाळीला कोरोना, नैसर्गिक आपत्तीचा फटका

१४ गावात घरांवर आकाश कंदील नाही; शेतकऱ्यांच्या दिवाळीला कोरोना, नैसर्गिक आपत्तीचा फटका

googlenewsNext
ठळक मुद्देआर्थिक समीकरण बिघडल्याने शेतकऱ्यांची दिवाळी साधेपणाने  सोयगाव शिवारात दिवाळीच्या दिवशीही शेती कामात गुंग होते 

सोयगाव : सोयगावसह तालुक्यात यंदाच्या दिवाळीचा उत्साह मंदावल्याचे चित्र शनिवारी पहाटे पासून पहावयास मिळाले आहे. ऐन दिवाळीच्या दिवशीही मजूर आणि शेतकऱ्यांनी शेताची वाट धरल्याने दिवाळीचा आनंद ग्रामीण भागात कमी असल्याचे दिसत होते. हतबल शेतकरी आणि हाताला काम नसल्याने हताश झालेला मजूर आर्थिक कोंडीत अडकल्याने दिवाळी साधेपणाने साजरी होत असून तालुक्यातील १४ गावात आकाश कंदीलही लावण्यात आले नाहीत. 

सोयगाव तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामावर विविध संकटे कोसळली. यातूनही शेतकऱ्यांनी मार्ग काढला, परंतु अतिवृष्टी, वादळी वारे, कपाशीवरील बोंडअळीचे संकट या संकटांच्या मालिकेने शेतकरी हतबल झाला. मजुरांनाही आधी कोरोना आणि नंतर नैसर्गीक संकट यामुळे हातांना कामे नसल्याने उदरनिर्वाहाची स्थिती बिकट झाली होती. कापूस वेचणीचे कामे आटोपले बोंडअळींनी कपाशीला उध्वस्त केल्याने शेतकऱ्यांनी कपाशीची पिकांना आग लावून दिल्या. त्यामुळे सोयगाव तालुक्यातील कापूस वेचण्या आटोपल्या आहेत. मात्र, शेतात काहीच उत्पन्न हाती आले नाही. रब्बीच्या हंगामात सोयगाव तालुक्यात केवळ ५५१ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. रब्बीच्या हंगामात मोजक्याच मजुरांच्या हातांना कामे मिळाले आहे. सोयगाव तालुक्यात नोंदणी झालेल्या मजुरांची संख्या हजाराच्या घरात असून शेतकऱ्यांची संख्याही ६८ हजार इतकी आहे. खरीप हंगामातील निसर्गाच्या संकटात शेतकरी आणि मजूर अडकल्याने आर्थिक समीकरण बिघडल्याने दिवाळी सणावर सावट पसरले आहे.

१४ गावात घरांवर आकाश कंदील नाही
दिवाळीच्या दिवशी ग्रामीण भागाचा फेरफटका मारला असता तब्बल १४ गावांतील घरांवर आकाश कंदील नसल्याचे दिसून आले. यावरून सोयगाव तालुक्यातील आर्थिक मंदीचा प्रत्यय आला आहे. तालुक्यात शेतकरी आणि मजुरांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांना पेरण्यांसाठी घेतलेल्या कर्जाच्या फेड रक्कमेची चिंता लागून आहे.

आर्थिक मंदीमुळे लग्नसराई संकटात
कोरोना संसर्गाच्या संकटात अडकलेली लग्नसराई यंदा पुन्हा दिवाळीनंतर सुरु होणार आहे. मात्र, या हंगामातही धुमधडाक्यात लग्न होण्याचे शक्यता  कमीच आहे. लग्नसोहळे जुळविण्याच्या हालचाली सुध्दा कमी प्रमाणावर झाल्याची माहिती आहे.

Web Title: There are no sky lanterns on houses in 14 villages; Corona, a natural disaster hit farmers' Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.