३५ उमेदवार असल्याने मराठवाडा पदवीधरसाठी पहिल्यांदाच तीन फोल्डची मतपत्रिका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 16:52 IST2020-11-25T16:09:08+5:302020-11-25T16:52:03+5:30
अंदाजानुसार विभागात २ हजार ९२८ मतपेट्या लागणार आहेत.

३५ उमेदवार असल्याने मराठवाडा पदवीधरसाठी पहिल्यांदाच तीन फोल्डची मतपत्रिका
औरंगाबाद : मराठवाडा पदवीधर निवडणूक रिंगणात यावेळी पहिल्यांदाच तीन फोल्ड (तीन घड्यांची) मतपत्रिका वापरली जाणार आहे. ३५ उमेदवार असल्यामुळे मोठी मतपत्रिका छापण्यात येणार आहे. त्यामुळे जास्त मतपेट्या लागणार असून प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.
अंदाजानुसार विभागात २ हजार ९२८ मतपेट्या लागणार आहेत. ३५ उमेदवार रिंगणात असल्यामुळे मतपत्रिकेत तीन कॉलम तयार केले आहेत, यानुसार पहिल्या दोन रकान्यांमध्ये प्रत्येकी १२, तर तिसऱ्या रकान्यामध्ये ११ उमेदवारांची नावे असतील. ज्या मतदान केंद्रांवर सहाशेपेक्षा कमी मतदान असेल तेथे दोन मतपेट्या देण्यात येतील. सहाशेपेक्षा अधिक मतदान असेल तेथे तीन मतपेट्या देण्यात येतील. विभागात ११२९ मतपेट्या वाढवून पेट्यांची संख्या २९२८ केली आहे. यामध्ये राखीव मतपेट्यांचाही समावेश आहे.
सुरक्षित अंतरासाठी केंद्रांवर मार्किंग
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या संभाव्य पार्श्वभूमीवर मतदारांत सुरक्षित अंतर राहण्यासाठी प्रत्येक केंद्रावर दोन मतदारांमध्ये किमान सहा फूट अंतराचे मार्किंग करण्यात येणार आहे. पुरुष, महिला, तसेच वृद्ध व अपंगांसाठी अशा स्वतंत्र तीन रांगा मतदान केंद्रावर असतील.