...तर आमचे ‘धक्का’मरण; ‘आयटीआय’च्या दुरावस्थेने विद्यार्थ्यांचे सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2018 16:19 IST2018-06-20T16:17:59+5:302018-06-20T16:19:02+5:30
शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संस्थेतील महागड्या मशिनरी असलेल्या कार्यशाळा क्रमांक २ चे पत्रे पूर्णपणे तुटले आहेत.

...तर आमचे ‘धक्का’मरण; ‘आयटीआय’च्या दुरावस्थेने विद्यार्थ्यांचे सार्वजनिक बांधकामच्या कार्यकारी अभियंत्यांना पत्र
- राम शिनगारे
औरंगाबाद : शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला (आयटीआय) विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संस्थेतील महागड्या मशिनरी असलेल्या कार्यशाळा क्रमांक २ चे पत्रे पूर्णपणे तुटले आहेत. पत्रे दुरुस्त न केल्यास पावसाचे पाणी विद्युत मशिनरीवर पडू शकते. यातून विद्युत प्रवाह मशिनरी, लोखंडी खांबात उतरल्यास प्रयोगशाळेत कार्यरत असलेले ६०० विद्यार्थी, ५० कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका पोहोचू शकतो. अशा आशयाचे पत्रच व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला पाठविले आहे.
मराठवाड्यात सर्वांत जुने आणि विद्यार्थी संख्येने मोठे ‘आयटीआय’ म्हणून औरंगाबादचे आयटीआय प्रसिद्ध आहे. या संस्थेतील २७ ट्रेडला प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये मोठी स्पर्धा असते. या संस्थेत प्रवेश झाल्यानंतर हमखास नोकरी मिळणार हे समीकरणही पक्के बनलेले आहे. अशा महत्त्वाच्या आणि रोजगार उपलब्ध करणाऱ्या संस्थेला अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या संस्थेत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाचे ज्ञान मिळण्यासाठी मोठमोठी आणि महागडी यंत्रे खरेदी करण्यात आलेली आहेत. ही यंत्रे ठेवलेल्या प्रयोगशाळेतील क्रमांक दोनचे छतच उखडले आहे. पत्रे जीर्ण झाल्यामुळे पावसाचे पाणी साचते.
मोठा पाऊस झाल्यास कायम विद्युत प्रवाह असलेल्या प्रयोगशाळेत मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. या प्रयोगशाळेचे छत दुरुस्त करण्यासाठी महाविद्यालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार केला. मात्र, त्यांच्या पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखविल्यामुळे प्राचार्यांनी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण प्रादेशिक कार्यालयाच्या निर्दशनास ही परिस्थिती आणून दिली. यानंतर प्रादेशिक कार्यालयानेच सार्वजनिक बांधकाम विभागाला ७ जून रोजी पत्र लिहिले आहे.
गंभीर धोका केला नमूद
या पत्रात पावसाच्या गळतीमुळे ६०० विद्यार्थी आणि ५० कर्मचाऱ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. या पावसामुळे कोणत्याही वेळी विद्युत प्रवाह मशिनरीत उतरून जीवितहानी होण्याचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. तरी आपण तात्काळ तुटलेले पत्रे बदलण्याचे काम हाती घ्यावे, जेणेकरून परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भविष्यात होणारी दुर्घटना टाळता येईल, असेही पत्रात म्हटले आहे. हे पत्र पाठवून दहा दिवसांची कालावधी उलटला तरीही सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आलेली नाही. हे विशेष.
वसतिगृहाची दुरुस्ती रखडलेलीच
आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी निवासव्यवस्था असलेल्या वसतिगृहाच्या दुरुस्तीचे कामकाज मागील तीन वर्षांपासून रखडले आहे. या प्रश्नावर विविध लोकप्रतिनिधींनी विधिमंळात अनेक वेळा आवाज उठवला. मात्र, त्यावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. वसतिगृह दुरुस्तीसाठी व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण विभागाकडे निधी उपलब्ध नाही, तर सार्वजनिक बांधकाम विभागही दुरुस्तीसाठी निधी देण्यास तयार नाही. संस्थेने जिल्हाधिकाऱ्यांशी अनेक वेळा पत्रव्यवहार करीत डीपीडीसीमधून निधी देण्याची मागणी केली. मात्र, अशा पद्धतीने निधी देता येत नसल्याचे उत्तर मिळाले. यामुळे दोन वर्षांपासून वसतिगृह बंद होते. मागील वर्षी आयटीआयमधील प्राचार्य, कर्मचाऱ्यांनी ७० हजार रुपयांचा निधी जमा करीत निवासायोग्य असलेल्या खोल्यांची तात्पुरती दुरुस्ती केली होती. यामुळे काही विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहता आले. यावर्षीही दुरुस्तीशिवायच विद्यार्थ्यांना वसतिगृहात राहावे लागणार आहे.
प्राधान्याने काम केले जाईल
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या त्या कार्यशाळेचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येईल. संबंधित कार्यकारी अभियंत्यांना याबाबत सूचना केल्या जातील.
- अतुल चव्हाण, अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, औरंगाबाद