उड्डाणपूलाखालील जलवाहिन्या अचानक पेटल्या; कोटिंग, पाइपमधील लाकडांमुळे धुराचे उंच लोट
By सुमित डोळे | Updated: November 11, 2023 19:38 IST2023-11-11T19:34:31+5:302023-11-11T19:38:38+5:30
पाईपला करण्यात आलेली कोटिंग, आधारासाठी ठेवलेले लाकडी बांबू व गंजीमुळे जवळपास दोन तास हवेत धुराचे लोट पसरले होते.

उड्डाणपूलाखालील जलवाहिन्या अचानक पेटल्या; कोटिंग, पाइपमधील लाकडांमुळे धुराचे उंच लोट
छत्रपती संभाजीनगर : रेल्वेस्थानक उड्डाणपुलाखाली ठेवलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीचे १७ ते १८ पाईप जळुन खाक झाले. शनिवारी दुपारी ३ वाजता हि घटना घडली. पाईपला करण्यात आलेली कोटिंग, आधारासाठी ठेवलेले लाकडी बांबू व गंजीमुळे जवळपास दोन तास हवेत धुराचे लोट पसरले होते.
शहरात ठिकठिकाणी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्यांचे पाईप ठेवण्यात आले आहेत. बहुतांश पाईप मोकळे मैदान, रस्त्याच्या कडेला एकावर एक रचून उभे करण्यात आले आहेत. शनिवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी अविनाश बोर्डे यांनी अग्निशमन विभागाला संपर्क करुन रेल्वे स्थानकाजवळील उड्डाणपुलाखालील पाईपला आग लागल्याचे कळवले. पदमपुरा अग्नीशमन केंद्राचे दोन बंब व सिडको उप अग्निशमन केंद्रातील एक बंब तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जवळपास ४० मिनिटानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आले. अधिकारी एल. पी. कोल्हे, एच. वाय. घुगे, वैभव बाकडे यांनी यासाठी कष्ट घेतले.
छत्रपती संभाजीनगर : रेल्वेस्थानक उड्डाणपुलाखाली ठेवलेल्या नव्या पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिन्या अचानक पेटल्या. pic.twitter.com/6uZt3rx29o
— Lokmat Chhatrapati Sambhajinagar (@milokmatabd) November 11, 2023
यापूर्वी शहरात याच प्रकल्पाच्या जलवाहिनीचे पाईप पेटल्याच्या दोन घटना घडल्या आहेत. अग्निशमन विभागाच्या जवानांच्या माहितीनुसार, आसपासचा कचरा, वाळलेल्या गवतामुळे पाईप पेट घेत आहेत. शिवाय, पाईपमध्ये गंजी, आधारासाठी लाकडी बांबू व नव्याने केलेल्या कोटिंगमुळे आग वेगाने वाढते. या घटनेत एकूण ४० पाईपपैकी १४ ते १५ पाईप पूर्णपणे जळाल्याचे त्यांनी सांगितले.