कुलगुरूंच्या भेटीचा धडाका सुरूच; ‘मशिप्र’ मंडळाच्या विधि महाविद्यालयात सामूहिक कॉपी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 13:34 IST2025-05-22T13:33:00+5:302025-05-22T13:34:11+5:30
दोनही हॉलमधील ५३ विद्यार्थ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे कुलगुरूंचे आदेश

कुलगुरूंच्या भेटीचा धडाका सुरूच; ‘मशिप्र’ मंडळाच्या विधि महाविद्यालयात सामूहिक कॉपी
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी परीक्षा केंद्रांना अचानक भेटींचा धडाका सुरूच ठेवलेला आहे. मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाच्या बीड शहरातील स्वातंत्र्यसेनानी रामराव अवरगावकर विधि महाविद्यालयाच्या दोन हॉलमध्ये ‘मास कॉपी’ आढळली. या दोनही हॉलमधील ५३ विद्यार्थ्यांचा संपूर्ण परफॉर्मन्स रद्द करण्याचे आदेश कुलगुरूंनी दिल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.
विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षा २९ एप्रिल तर ६ मेपासून व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. कुलगुरूंनी पदव्युत्तर परीक्षेत २९ एप्रिल रोजीच बीड शहरातील तीन परीक्षा केंद्रांना भेट दिली होती. त्यात बलभीम महाविद्यालय १५, केएसके महाविद्यालयात १५ आणि आदित्य व्यवस्थापनशास्त्रमध्ये ६ विद्यार्थी पकडण्यात आले होते. दुसऱ्या टप्प्यात कुलगुरूंनी बीड येथील स्वातंत्र्यसेनानी रामराव पाटील विधि महाविद्यालयास बुधवारी भेट दिली. ‘मास कॉपी’ आढळून आल्यामुळे ५३ विद्यार्थ्यांकडून उत्तरपत्रिका जमा करून घेण्यात आल्या. तसेच तीन मोबाईलही जप्त करून केंद्र संचालकांकडे सोपविले. कुलगुरूंच्या पथकात डॉ. प्रवीण यन्नावर, डॉ. भास्कर साठे व प्रा. सचिन भुसारी यांचा समावेश होता.
२१ मे रोजी कुलगुरूंच्या भेटी
कुलगुरू डॉ. फुलारी यांनी बुधवारी सकाळच्या सत्रात धाराशिव जिल्ह्यातील चार परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. त्यात के. टी. पाटील फार्मसी महाविद्यालयात २ आणि आर. पी. विधि महाविद्यालयात ४ विद्यार्थी कॉपी करताना पकडले. त्याच वेळी रामकृष्ण परमहंस महाविद्यालय व के. टी. पाटील एमबीए महाविद्यालयात विद्यार्थी कॉपी करताना आढळले नाहीत. दुपारच्या सत्रात बीड शहरातील अवरगावकर विधि महाविद्यालयात ५३ विद्यार्थी ‘मास कॉपी’ करताना पकडले.
२० मे रोजीच्या भेटी
कुलगुरूंच्या पथकाने मंगळवारी छत्रपती संभाजीनगरातील सिद्धार्थ ग्रंथालयशास्त्र महाविद्यालय, पडेगावमध्ये ७ विद्यार्थी कॉपी करताना पकडले. त्याशिवाय दोघांकडे मोबाईलही सापडले. वसंतराव नाईक महाविद्यालयातील हॉलमध्ये प्रचंड अस्वच्छता, ‘मास कॉपी’सह तीन विद्यार्थी पकडले. दुपारच्या सत्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयात १ विद्यार्थी कॉपी करताना पकडला. पितांबरे महाविद्यालय, पडेगावमध्ये एकही कॉपीबहाद्दर आढळला नाही.