विद्यापीठाचा ‘युवक महोत्सव’ जिल्हानिहाय होणार; तर स्वतंत्र लोककला महोत्सवाचे देखील आयोजन
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:20 IST2025-05-27T14:20:47+5:302025-05-27T14:20:58+5:30
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या संकल्पनेतील ‘लोककला महोत्सव’ही यंदापासून स्वतंत्रपणे घेण्यास व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता

विद्यापीठाचा ‘युवक महोत्सव’ जिल्हानिहाय होणार; तर स्वतंत्र लोककला महोत्सवाचे देखील आयोजन
छत्रपती संभाजीनगर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे येत्या शैक्षणिक वर्षापासून चारही जिल्ह्यांत स्वतंत्रपणे ‘युवक महोत्सव’चे आयोजन करण्यात येणार आहे. त्याच वेळी कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या संकल्पनेतील ‘लोककला महोत्सव’ही यंदापासून स्वतंत्रपणे घेण्यास व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मान्यता दिली आहे.
विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. बैठकीस प्रकुलगुरू डॉ. वाल्मीक सरवदे, कुलसचिव डॉ. प्रशांत अमृतकर यांच्यासह १९ सदस्य उपस्थित होते. बैठकीत २४ प्रस्तावांवर चर्चा करण्यात आली. केंद्रीय युवा महोत्सव सल्लागार समितीच्या सूचना मान्य करण्यात आल्या आहेत. त्यात प्रत्येक संलग्नित महाविद्यालयांना किमान दोन कलाप्रकारांत सहभागी होण्याबाबत बंधनकारक करण्यात येणार आहे. केंद्रीय लोककला युवा महोत्सव स्वतंत्र आणि युवा महोत्सव जिल्हानिहाय घेण्याबाबत मान्यता देण्यात आली. केंद्रीय लोककला महोत्सव नामविस्तार दिनाच्या पूर्वी घेण्यात येणार आहे. त्याशिवाय साई सकल शिक्षण प्रसारक मंडळ संचालित कला वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय, चिकलठाण, (ता. कन्नड) हे महाविद्यालय आसावा ब्रदर्स संस्थेकडे हस्तांतरण करण्यासाठी प्रकुलगुरूंच्या अध्यक्षतेत समिती स्थापना केली. मराठवाडा इन्स्टिट्यूट ऑफ करिअर एज्युकेशन मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च या महाविद्यालयाचे नाव बदलून मातोश्री श्रीकंवर महाविद्यालय असे करण्यास मंजुरी दिली. या बैठकीत चार समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कुलगुरूंच्या अभिनंदनाचा ठराव
कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांनी वार्षिक परीक्षेच्या काळात अनेक परीक्षा केंद्रांना भेटी दिल्या. योग्य त्या सूचना केल्या. त्याचा आगामी काळात परीक्षेत पारदर्शकता होण्यास मदत होणार आहे. याबद्दल कुलगुरूंच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. त्याशिवाय केंद्रीय संरक्षण मंत्रालयाअंतर्गत राष्ट्रीय छात्र सेनेची ‘कर्नल कमांडंट’ ही उपाधी जाहीर झाल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला. दोन्ही प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आले.