विशेष मुलांच्या हातांनी विणलेला प्रेमाचा धागा परदेशात पोहचला; पैश्यांसह मिळाला आत्मविश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2025 17:02 IST2025-08-07T17:01:19+5:302025-08-07T17:02:34+5:30
विशेष मुलांनी बनविल्या राख्या : प्रत्येक विकलेल्या राखीसोबत त्यांना केवळ मोबदला नव्हे, तर ‘मीही काही तरी करू शकतो’ हा आत्मविश्वास मिळत आहे.

विशेष मुलांच्या हातांनी विणलेला प्रेमाचा धागा परदेशात पोहचला; पैश्यांसह मिळाला आत्मविश्वास
छत्रपती संभाजीनगर : रक्षाबंधन प्रेमाचा, नात्यांचा आणि आपुलकीचा सण. यंदा शहरातील काही विशेष हातांमुळे. स्वमग्न, गतिमंद आणि विशेष मुलांनी बनविलेल्या राख्या राज्यातच नव्हे, तर देशाबाहेर आयर्लंड, स्वीडनमध्येदेखील गेल्या. आरंभ, नवजीवन, स्वयंसिद्ध या संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुलांनी रंगीबेरंगी कल्पनांनी हजारो राख्या तयार केल्या. प्रत्येक राखी ही धागा नाही, तर त्या मुलांच्या मनातील स्वप्नांची गाठ आहे.
या शाळांमधील मुले रोजगाराचे, स्वावलंबनाचे धागे विणत आहेत. प्रत्येक विकलेल्या राखीसोबत त्यांना केवळ मोबदला नव्हे, तर ‘मीही काही तरी करू शकतो’ हा आत्मविश्वास मिळत आहे.
रक्षाबंधनाचा आरंभ
आरंभ शाळेतील विद्यार्थी २०१६ पासून वेगवेगळ्या प्रकारच्या सुबक वस्तू बनवतात. यावर्षी २५ मुलांनी दोन हजार राख्या, गिफ्ट हॅम्पर्सदेखील बनविले. ३ महिने आधीपासून या कामांना सुरुवात होते. मिळालेल्या पैशातून आपल्या आई, आजीसाठी त्यांना काही तरी घ्यायचे असते. संस्थेच्या अंबिका टाकळकर म्हणाल्या, मॉलमध्ये गेल्यावर एकदा साद नावाच्या विद्यार्थ्याने माझ्यासाठी एक ड्रेस निवडला. म्हणाला, "मॅडम, ये आपके लिये", हे ऐकून भरून आले. आपल्या विद्यार्थ्याने त्याच्या कमाईचा ड्रेस आपल्याला ऑफर करणे, यापेक्षा आनंददायी काय असू शकते ?
समाधान लाखमोलाचे
नवजीवन संस्थेत १५० मुले आहेत. येथील मुलांनी एक हजार राख्या बनविल्या. ज्या राज्यासह राज्याबाहेरही पाठविण्यात आल्या. नाथ स्कूल ऑफ बिझनेसच्या विद्यार्थ्यांनी राख्या सर्वदूर पोहोचविण्यासाठी मदत केली. या कामासाठी मुलांच्या बँक खात्यात पैसे जमा केले जातात. अभिजीत जोशी यांनी सांगितले की, संस्थेतली एक मुलगी तिच्या भाच्यांना ती मिळालेल्या पैशांमधून नवे कपडे घेऊन देते. यातून तिला मिळणारे समाधान लाखमोलाचे आहे.
मुलांमध्ये आत्मविश्वास
स्वयंसिद्ध मतिमंद मुलांच्या शाळेत आतापर्यंत २५० राख्या बनविण्यात आल्या. विशेष म्हणजे यांच्या ५० राख्या आयर्लंड, स्वीडनला गेल्या. सध्या शाळेत ६० मुले असून, त्यातील ३० मुलांनी या राख्या बनविल्या. बाजारातील राख्या बघतांना या मुलांना आत्मविश्वास आला की आपणही अशाच राख्या बनवू शकतो. मुले घरी आनंदाने सांगतात की, आता मला पगार मिळणार आहे; असे शाळेतील शिक्षकांनी सांगितले.