उपेक्षितांचा आधार हिरावला! स्वातंत्र्यसेनानी ज्येष्ठ विधीज्ञ अरुणचंद्र कपाडिया यांचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 19:18 IST2025-07-26T19:15:15+5:302025-07-26T19:18:10+5:30
मराठवाडा मुक्ती संग्रामात गोविंदभाई श्रॉफ यांच्यासमवेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.

उपेक्षितांचा आधार हिरावला! स्वातंत्र्यसेनानी ज्येष्ठ विधीज्ञ अरुणचंद्र कपाडिया यांचे निधन
छत्रपती संभाजीनगर: ज्येष्ठ वकिल व धर्मनिरपेक्ष व्यक्तिमत्त्व ॲडव्होकेट अरुणचंद्र कपाडिया ( वय- ९६) यांचे आज पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले. वयाच्या ९६व्या वर्षीही ते पूर्णपणे स्वावलंबी, मानसिकदृष्ट्या प्रगल्भ आणि कोणत्याही औषधाशिवाय निरोगी होते.‘गरिबांचा वकील, उपेक्षितांचा आधार’ अशी त्यांची ओळख निर्माण झाली होती.
त्यांचे संपूर्ण वकिली जीवन गरिबांच्या हक्कासाठी, उपेक्षितांच्या न्यायासाठी समर्पित होते. त्यांनी हजारो प्रकरणे निकाली काढून, अनेक कुटुंबांना न्याय मिळवून दिला. त्यांचा दृष्टिकोन नेहमी व्यावसायिक हितांपेक्षा मानवी मूल्यांना प्राधान्य देणारा होता. न्यायालयात ते केवळ युक्तिवाद करणारे नव्हते, तर सत्य, सहानुभूती आणि तत्त्वज्ञान घेऊन उपस्थित राहणारे योध्दा होते. औरंगाबाद खंडपीठ स्थापनेत त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांच्या शिष्यांपैकी अनेक जण उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालयांचे न्यायाधीश, तर एकाने तर भारताचे गृहमंत्री पद भूषवले.तत्कालिन औरंगाबादचे नगराध्यक्ष म्हणून त्यांनी त्यावेळी आज भेडसावत असलेल्या पाणीप्रश्नात लक्ष घातले होते. मराठवाडा मुक्ती संग्रामात गोविंदभाई श्रॉफ यांच्यासमवेत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.
कपाडिया कुटुंबात ते सात भावंडांपैकी एक, म्हणजे पाच बहिणी, दोन भाऊ! पुत्र हेमंत कपाडिया हे सध्या महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे कायदेशीर सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. सून रेखा कपाडिया यांना त्यांनी १९८० च्या दशकात पत्रकारिता करण्यासाठी प्रोत्साहन दिले आणि पुढे त्या ग्राहक मंच न्यायालयात न्यायाधीश म्हणून कार्यरत राहिल्या. धाकटा भाऊ प्रफुल्ल कपाडिया यांनी सेंट्रल बँकेतून स्वेच्छानिवृत्तीनंतर त्यांच्या प्रेरणेतून वकिली क्षेत्रात पदार्पण केले. थोरली कन्या सुषमा शाह यांना त्यांनी कारागृहातील पीडित व्यक्तींसाठी काम करण्याची प्रेरणा दिली. आज त्या कौटुंबिक समुपदेशन व वंचित मुलींना सशक्त करणाऱ्या सामाजिक उपक्रमांत सक्रिय असतात. मधली कन्या सीमा, ही एक कंप्युटर अभियंता असून, ती अमेरिकेत स्थायिक आहे.धाकटी कन्या डॉ. यामिनी मिस्त्री या एक यशस्वी दंतचिकित्सक आहेत.
राजकीय जीवनात वेळोवेळी मार्गदर्शन
ॲड. अरुणचंद्र कपाडिया हे एक आदरणीय, निस्पृह, ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व.ज्येष्ठ ज्ञा डाव्या व पुरोगमाी विचारसरणीचे नेते. त्यांनी माझ्या राजकीय जीवनात मला वेळोवेळी मार्गदर्शन केले. राजकीय, सामाजिक व विशेषत: वकिली क्षेत्रातील त्यांचे कर्तृत्त्व भावी पिढ्यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल. गेल्याच वर्षी ‘ लोकमत’त्यांना सत्कार केला होता. लोकमततर्फे ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला होता. मी राजकारणात असताना त्यांच्याशी नेहमीच संवाद साधत असे. शहराच्या व विभागाच्या विकासासाठी ते बहुमूल्य मार्गदर्शन करत असत. एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपले. त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली.
- राजेंद्र दर्डा, माजी मंत्री व एडिटर इन चीफ, लोकमत वृत्तपत्र समूह