शालार्थ घोटाळ्याचे लोण मराठवाड्यात? ‘एसआयटी’साठी फाइलींवरची धूळ झटकण्यास सुरुवात
By राम शिनगारे | Updated: December 17, 2025 14:53 IST2025-12-17T14:53:01+5:302025-12-17T14:53:50+5:30
शालेय शिक्षण विभागात शालार्थ घोटाळा गत अनेक महिन्यांपासून गाजत आहे. नागपूर विभागातील घोटाळ्यात शिक्षण विभागातील अनेक मातब्बर अधिकाऱ्यांसह संस्थाचालकांनी कारागृहात जावे लागले.

शालार्थ घोटाळ्याचे लोण मराठवाड्यात? ‘एसआयटी’साठी फाइलींवरची धूळ झटकण्यास सुरुवात
छत्रपती संभाजीनगर : राज्यभरात गाजत असलेल्या शालार्थ घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रभर असल्याची चर्चा होत आहे. नागपूरनंतर नाशिक विभागात मोठा घोटाळा उघडकीस आल्यानंतर विशेष तपास पथकाने (एसआयटी) मराठवाड्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. छत्रपती संभाजीनगर उपसंचालक कार्यालयासह विभागातील पाचही जिल्ह्यांतील शिक्षणाधिकाऱ्यांना २०१२ ते २०२४ या कालावधीतील वैयक्तिक मान्यता, शालार्थ आयडीच्या फाइल चौकशीसाठी तयार ठेवण्याचे आदेश आले आहेत. त्यामुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह इतरांच्या सेवा अधिगृहित करून फाइलींवरील धूळ झटकण्यास सुरुवात झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शालेय शिक्षण विभागात शालार्थ घोटाळा गत अनेक महिन्यांपासून गाजत आहे. नागपूर विभागातील घोटाळ्यात शिक्षण विभागातील अनेक मातब्बर अधिकाऱ्यांसह संस्थाचालकांनी कारागृहात जावे लागले. त्यानंतर नाशिक विभागातही घोटाळ्याची व्याप्ती वाढली. त्याच वेळी राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी ‘एसआयटी’च्या चाैकशीसाठी मराठवाड्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडी दिल्याच्या फाइल तयार ठेवण्याचे आदेश आले आहेत. २०१२-१९ आणि २०१९-२४ या कालखंडातील फाइलचा शोध घेण्यात येत आहे. त्यानुसार छत्रपती संभाजीनगरच्या शालेय शिक्षण विभागाने वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीच्या फाइलवरील धूळ झटकण्यासाठी अतिरिक्त ठरलेले शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कामाला लावले आहे. त्याशिवाय काही सेवाही अधिगृहित केल्यात. सापडलेल्या फाइलही तत्काळ स्कॅन केल्या जात असून, या फाइल स्कॅन करण्यासाठी अत्याधुनिक स्कॅनरही मागविल्याची माहिती शालेय शिक्षण विभागातून देण्यात आली.
तत्कालीन अधिकारी, कर्मचाऱ्यांना देणार नोटीस
सन २०१२ ते २०२४ या कालखंडातील वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीच्या फाइली शोधण्यास सुरुवात झाली आहे. ज्या कालखंडातील फाइल सापडणार नाहीत. त्या कालावधीतील कार्यालय प्रमुख, प्रशासन अधिकारी आणि संबंधित टेबलचा लिपिकांना फाइलीच्या शोधासाठी नोटीस देण्यात येतील. तसेच त्या संपूर्ण फाइलची जबाबदारी संबंधितांवर निश्चित करण्याच्या सूचना शिक्षण विभागाला मिळाल्या आहेत.
कर्मचारीच शिक्षक बनलेल्याची स्वतंत्र यादी
छत्रपती संभाजीनगर विभागात शिक्षकांच्या नियुक्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘हेराफेरी’ झाल्याची चर्चा आहे. त्यात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची शिक्षक म्हणून नियुक्ती केल्याची प्रकरणेच सर्वाधिक असल्याचे तपासणीत समोर आले आहे. त्यामुळे अशा प्रकरणांची स्वतंत्र यादी बनविण्याच्या सूचनाही दिल्या आहेत.
अनुदानितवरच्या बदल्यांची चौकशी
अनेक शिक्षण संस्थांमध्ये विनाअनुदानितवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियुक्ती दाखविली आहे. या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची बदली अनुदानितवर केल्याची शेकडो प्रकरणे समोर आली आहेत. त्याची संख्याही समोर येणार असून, तशा पद्धतीची माहिती उपलब्ध करून ठेवण्याच्या सूचनाही शालेय शिक्षण विभागाला मिळाल्या आहेत.
उपसंचालक कार्यालयाकडून ४ हजार ७५ वैयक्तिक मान्यता
शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून विभागातील जिल्ह्यातील उच्च माध्यमिकच्या तब्बल ४ हजार ७५ वैयक्तिक मान्यता दिल्या आहेत. त्या फाइलीसह शालार्थ आयडीच्या फाइलीही जतन करण्यात येत आहेत. त्याशिवाय प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागाकडून प्राथमिक, उच्च प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वैयक्तिक मान्यता व शालार्थ आयडी दिल्याचा आकडा जमविण्यात येत आहे.