बोगस पदवी घोटाळ्याची व्याप्ती वाढली; प्राचार्य शंकर अंभोरेसह एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 12:37 IST2025-04-19T12:29:13+5:302025-04-19T12:37:06+5:30

कोहिनूर महाविद्यालयासह इतर ठिकाणच्या १४ लोकांनी बोगस पदव्यांच्या आधारे नोकरी मिळविल्याचा पोलिसांना संशय आहे.

The scope of the bogus degree scam has increased; Principal Shankar Ambhore and one other person have been arrested | बोगस पदवी घोटाळ्याची व्याप्ती वाढली; प्राचार्य शंकर अंभोरेसह एकाला अटक

बोगस पदवी घोटाळ्याची व्याप्ती वाढली; प्राचार्य शंकर अंभोरेसह एकाला अटक

छत्रपती संभाजीनगर : बोगस एम.फिल. पदवीच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश घेणारे खुलताबाद येथील कोहिनूर शिक्षण संस्थेच्या सचिव अस्मा खान व सहसचिव मकसूद खान या दोघांच्या विरोधात विद्यापीठाने बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता. या प्रकरणात संस्थाध्यक्ष मजहर खान यासही आरोपी बनविले आहे. त्याच महाविद्यालयातील कनिष्ठ विभागात कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या बोगस पदवीच्या आधारे नोकरी मिळविणारे मोहंमद हफिज उररहमान मोहंमद मोईनोद्दीन (३२, रा. हडको कॉर्नर, यादवनगर) व प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांना अटक केल्याची माहिती पोलिस अधिकाऱ्यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे रिपाइं (आठवले गट) पक्षाचे शहराध्यक्ष नागराज गायकवाड यांनी कोहिनूर संस्थेच्या सचिव अस्मा खान व सहसचिव मकसूद खान यांनी डी.वाय. पाटील विद्यापीठाच्या बोगस एम.फिल. पदवीच्या आधारे पीएच.डी.ला प्रवेश घेतल्याची तक्रार केली होती. पडताळणी केल्यानंतर प्रशासनाने बेगमपुरा पोलिस ठाण्यात अस्मा खान व मकसूद खान यांच्या विरोधात २६ मार्च रोजी गुन्हा नोंदविला. ३० मार्च रोजी अस्मा खान यांना अटक केली. त्यांच्यासह इतरांच्या जबाबावरून संस्थाध्यक्ष मजहर खान हाच बाेगस पदव्यांचा मास्टरमाइंड असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी ७ एप्रिल रोजी मजहरला अटक केली. तीन दिवस पोलिस कोठडी मिळाल्यानंतर मजहरची हर्सूल कारागृहात रवानगी केली.

याच महाविद्यालयातील मोहंमद हफिज उररहमान मोहंमद मोईनोद्दीन याने कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या बोगस पदवीच्या आधारे नोकरी मिळवली होती. त्याविषयीचा शिक्षण उपसंचालकांनी पोलिसांकडे अहवाल सुपुर्द केला. त्यावरून पोलिसांनी त्यास अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, २१ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली. त्याने दिलेल्या जबाबानुसार मजहर खान याच्यासह प्राचार्य डॉ. शंकर अंभोरे यांनी मदत केली. त्यामुळे डॉ. शंकर अंभोरे यांना राहत्या घरातून पोलिसांनी सायंकाळी अटक केली. तपास सहायक पोलिस आयुक्त संपत शिंदे, पोलिस उपनिरीक्षक अजित दगडखैर यांच्यासह पथक करीत आहे.

१४ जण पोलिसांच्या रडारवर
कोहिनूर महाविद्यालयासह इतर ठिकाणच्या १४ लोकांनी बोगस पदव्यांच्या आधारे नोकरी मिळविल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलिस प्रशासनाने विद्यापीठाकडून संबंधितांच्या पदव्यांची पडताळणी करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणात मोठमोठे मासे पोलिसांच्या गळाला लागण्याची शक्यता आहे.

Web Title: The scope of the bogus degree scam has increased; Principal Shankar Ambhore and one other person have been arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.