वाहतूक प्रोटोकॉल नको म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पैठण दौऱ्यासाठी 'लालपरी'चा मार्गच बदलला
By संतोष हिरेमठ | Updated: September 12, 2022 14:42 IST2022-09-12T14:42:11+5:302022-09-12T14:42:23+5:30
''माझ्या ताफ्यासाठी वाहतूक रोखू नका' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी 'एसटी'चा मार्गच बदलला.

वाहतूक प्रोटोकॉल नको म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या पैठण दौऱ्यासाठी 'लालपरी'चा मार्गच बदलला
औरंगाबाद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यासाठी लालपरी म्हणजे एसटी बसचा मार्ग बदलण्यात आल्याचे समोर आले आहे. पैठणकडे औरंगाबाद आणि पाथर्डी-शेगावहून येणाऱ्या जाणाऱ्या बसचा मार्ग बदलण्यात आला आहे.
''माझ्या ताफ्यासाठी वाहतूक रोखू नका' म्हणणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यासाठी 'एसटी'चा मार्गच बदलला. माझ्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल देऊन लोकांना वाहतुकीत अडवून ठेवू नका, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी पोलिसांना दिले होते. मात्र प्रत्यक्षात औरंगाबाद येथील पैठण दौऱ्यात पैठण रोडवरून एसटीच्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. औरंगाबादहून पैठणला जाणाऱ्या बस पाचोडमार्गे पाठविण्यात येत आहेत. तसेच पाथर्डी-शेगावहून येणाऱ्या बसेस नेवासामार्गे पाठवल्या आहेत.
दरम्यान, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कावसानकर स्टेडियम येथील नियोजनाची पाहणी केली. विमानतळ ते पैठण येथील नाथ मंदिरामार्गे सभेच्या मुख्य ठिकाणपर्यंतचा रस्त्याचा आढावा घेतला. विमानतळ ते पैठणपर्यंतचे रस्ते सुस्थितीत ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम विभागाने दिले.
असा आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दौरा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दि. १२ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता शहरात येत आहेत. चिकलठाणा विमानतळावर आगमन झाल्यानंतर ते वाहनाने पैठणकडे रवाना होती. दुपारी दोन वाजता त्यांची पैठणमध्ये सभा होईल. सभेनंतर ते आपेगावला जातील. पाच वाजता रोजगार हमी योजनामंत्री संदीपान भुमरे यांच्या निवासस्थानी ते जातील. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता विमानाने मुंबईकडे रवाना होतील.