दिवसा डांबरीकरण केलेल्या रस्त्याचा रात्रीतून फुपाटा; वाळूच्या हेवीलोड हायवांचा प्रताप
By विकास राऊत | Updated: April 25, 2025 17:51 IST2025-04-25T17:50:51+5:302025-04-25T17:51:56+5:30
दिवसा डांबरीकरण केलेल्या रस्त्यावर रात्री वाळूच्या हायवांच्या दणदणाटाने सकाळपर्यंत रस्त्याचा फुपाटा उडतो, साडेपाच कोटींच्या रस्त्याचे काम ठप्प

दिवसा डांबरीकरण केलेल्या रस्त्याचा रात्रीतून फुपाटा; वाळूच्या हेवीलोड हायवांचा प्रताप
छत्रपती संभाजीनगर : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून पैठण तालुक्यातील राज्य महामार्ग हनुमंतवाडी ते दादेगाव जहाँगीर (जुने) ते दादेगाव जहाँगीर (नवे) या साडेपाच कोटींतून होणाऱ्या ७ कि.मी. रस्त्याचे दिवसा डांबरीकरण करण्यात येते. मात्र, रात्रीतून वाळूने भरलेल्या हेवीलोड हायवांच्या वाहतुकीमुळे सकाळपर्यंत रस्त्यावर फुपाटा होत आहे.
कच्च्या रस्त्यावरून हायवाची वाहतूक होऊ नये, यासाठी ग्रामस्थ रोज रात्री १ वाजेपर्यंत पहारा देतात, परंतु त्यानंतर हायवांची वाहतूक सुरू होते, ती पहाटेपर्यंत चालते. सुमारे पाच हजार लोकसंख्या असलेल्या या गावातील शेतमाल व इतर दळणवळणासाठी हा एकमेव रस्ता असून, त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून हाती घेण्यात आले. परंतु, त्यालाही वाळूच्या चोरट्या वाहतुकीमुळे खीळ बसली आहे. परिणामी, कंत्राटदाराची टीम वैतागली असून, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी पैठण पोलिसांना या प्रकरणात लक्ष घालण्यासाठी पत्र दिले आहे. किमान रस्त्याचे काम होईपर्यंत तरी जडवाहतूक थांबल्यास रस्ता टिकेल. अन्यथा, रस्ता लवकर खराब होईल, असे रस्ते विकास संस्थेचे मत आहे.
अभियंत्यांचे पोलिसांना साकडे
त्या रस्त्यावरून अवजड वाहतूक ही प्रति एक्सल ८ टन अशी आहे. मात्र, त्यावरून रात्रीतून चोरटी वाळू वाहतूक होत असल्याने रस्ता खचून फुटतो आहे. रस्त्याचे डांबरीकरण, खडीकरणाचे काम सध्या सुरू असून, त्यावरून २३ रोजी मध्यरात्रीनंतर मोठ्या प्रमाणात हायवांची वाहतूक झाल्याने रस्त्याचा भुगा झाला. त्यामुळे वाळूची अवजड वाहतूक बंद करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. तो रस्ता गावकऱ्यांच्या दैनंदिन गरजेसाठी आहे, त्यावर जडवाहतूक होत राहिली तर तो जास्त दिवस टिकणार नाही, असे महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था अभियंत्यांनी पोलिसांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे.
रस्त्याची तांत्रिक माहिती
रस्त्याचे नाव : राज्य महामार्ग हनुमंतवाडी ते दादेगाव जहाँगीर (जुने-नवे)
रस्त्याचा खर्च किती : ५ कोटी ५० लाख
किती कि.मी. रस्ता : ७ किलोमीटर
गावची लोकसंख्या : ५ हजार
कंत्राटदार कोण : एस. डी. दोंडे
कार्यवाह यंत्रणा : महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था