मराठा आंदोलनाचा परिणाम लोकसभा निकालावर दिसेल, मनोज जरांगे पाटील यांचा दावा

By बापू सोळुंके | Published: May 14, 2024 05:28 PM2024-05-14T17:28:57+5:302024-05-14T18:18:21+5:30

मनोज जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

The result of the Maratha agitation will be seen in the Lok Sabha result, claims Manoj Jarange | मराठा आंदोलनाचा परिणाम लोकसभा निकालावर दिसेल, मनोज जरांगे पाटील यांचा दावा

मराठा आंदोलनाचा परिणाम लोकसभा निकालावर दिसेल, मनोज जरांगे पाटील यांचा दावा

छत्रपती संभाजीनगर: मराठा समाजाला सगे-सोयऱ्याचा कायदा द्यावा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे रद्द करावे, यासह अन्य मागण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी ४ जूनपासून अंतरवाली सराटी (जि. जालना) येथे पुन्हा उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. यासोबतच आमच्या आंदोलनाचा परिणाम आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर दिसेल असेही जरांगे पाटील यांनी मंगळवारी येथे पत्रकारांना सांगितले. 

छत्रपती संभाजीनगर येथे बुलंद छावा संघटनेच्यावतीने आयोजित छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.यावेळी छत्रपती संभाजी राजेंच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले की, मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिले, मात्र हे आरक्षण लागू झाले नाही. सगेसोयऱ्याचा कायदा केला नाही, आंदोलकांवरील गुन्हे परत घेतले नाही, यामुळे ४ जूनपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरवात करणार आहे. 

तुमच्या या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर समाजाला काय आवाहन करणार या प्रश्नाचे उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले की, सर्व गोरगरीब मराठा समाज माझ्या पाठिशी आहे, मराठा समाजानेही शांततेत आंदोलन करायचे आहे. ८ जून रोजी नारायणगड(जि.बीड) येथे ६ कोटी मराठ्यांची जाहिर सभा होणार आहे. या सभेसाठी सुमारे ५० हजार स्वयंसेवक असतील. या सभेची काय तयारी सुरू आहे, याचा आढावा घेण्यासाठी आपण नारायणगड येथे जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

लोकसभा निवडणुकीच्या आतपर्यंत झालेल्या तीन टप्प्यात मराठा आंदोलनाचा काय परिणाम जाणवला, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, आमचा महायुती अथवा महाविकास आघाडीला किंवा अपक्षाला पाठिंबा नव्हता. केवळ मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना पाडा असे सांगितले होते. मी राजकारणी नसल्याने निवडणुकीत काय परिणाम झाला हे मला सांगता येणार नसल्याचे त्यांनी नमूद केले. एकमात्र झाले की, पंतप्रधान मोदी साहेब महाराष्ट्रात येत नव्हते. ते गेल्या काही दिवसांपासून सतत महाराष्ट्रात सभा घेत आहे. हा मराठ्यांचा 'डर' असल्याचा दावा त्यांनी केला.

देवेंंद्र फडणवीस यांनी मराठ्यांचा द्वेष सोडावा
आम्ही मराठ्यांच्या विरोधात नव्हतो. पण फडणवीस यांनी आरक्षणाला विरोध केला, महिलांवर लाठीहल्ला केला, गोरगरीब मराठा आंदोलकांवर गुन्हे नोंदविले, महिलांनाही तडीपार केले. यामुळे आमचा त्यांना विरोध आहे. त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडावा, असे आवाहन जरांगे पाटील यांनी फडणवीस यांना केले.

Web Title: The result of the Maratha agitation will be seen in the Lok Sabha result, claims Manoj Jarange

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.