पैठणमध्ये चौरंगी लढतीत भुमरे पिता-पुत्रांची प्रतिष्ठा पणाला; प्रचार अंतिम टप्प्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2025 19:54 IST2025-11-28T19:49:57+5:302025-11-28T19:54:08+5:30
उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे आणि भाजपाचे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीनंतर ठरणार आहे.

पैठणमध्ये चौरंगी लढतीत भुमरे पिता-पुत्रांची प्रतिष्ठा पणाला; प्रचार अंतिम टप्प्यात
- दादासाहेब गलांडे
पैठण : येथील नगरपरिषद निवडणुकीत चौरंगी लढत होत असून, शिंदेसेनेचे खासदार संदीपान भुमरे व त्यांचे पुत्र आ. विलास भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तसेच उद्धवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दत्ता गोर्डे आणि भाजपाचे माजी नगराध्यक्ष सूरज लोळगे यांचे राजकीय भवितव्य या निवडणुकीनंतर ठरणार आहे. त्यामुळे निवडणुकीत प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात सर्वच पक्षांच्या उमेदवार व नेत्यांनी झोकून दिले आहे.
पैठणचे नगराध्यक्षपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव असून येथे शिंदेसेनेच्या विद्या भूषण कावसानकर, भाजपाकडून मोहिनी सूरज लोळगे, उद्धवसेनेकडून अपर्णा दत्तात्रय गोर्डे, काँग्रेसकडून सुदेवी योगेश जोशी, एआयएमआयएमकडून नाहीद अख्तर बागवान आणि आझाद स्वाभिमानी सेनेकडून अतिया बेगम कादरी हे सहा उमेदवार रिंगणात आहेत. असे असले तरी या पदासाठी चौरंगी लढत होणार असल्याची चर्चा आहे.
मागील विधानसभा निवडणुकीत उद्धवसेनेला मोठ्या प्रमाणात मुस्लीम मते मिळाली होती; परंतु यंदा काँग्रेस, एआयएमआयएम आणि अन्य उमेदवार रिंगणात उतरल्यामुळे मुस्लीम मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतांचा कल कोणाकडे अधिक राहील त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरणार आहे.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत शिंदेसेनेला भरभरून मदत केलेला भारतीय जनता पक्ष यावेळी स्वत:च्या अस्तित्वासाठी लढत आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत याच पक्षाचा नगराध्यक्ष झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपलाच संधी देण्याचे साकडे काही दिवसांपूर्वी भाजपचे माजी खासदार रावसाहेब दानवे यांनी पैठणकरांना घातले होते. जालना लोकसभा निवडणुकीत पैठणमधून काँग्रेसला लीड मिळाली होती. त्यानंतर विधानसभेला शिंदेसेनेने विजय संपादन केला होता. आता येथे शिंदे व भाजपा वेगवेगळे लढत असल्याने दोन्हीपैकी कोणाला पैठणकर साथ देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पैठणवर आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध करण्यासाठी व विधानसभेचा विजय हा योगायोग नव्हता, हे दाखविण्यासाठी येथील लढत खा. संदीपान भुमरे व आ. विलास भुमरे या पिता-पुत्रांसाठी प्रतिष्ठेची बनली आहे.
मोठ्या नेत्यांच्या सभांची प्रतीक्षा
निवडणूक प्रचारास अवघे ३ दिवस उरले असताना राज्य पातळीवरील नेत्यांच्या अद्याप सभा झालेल्या नाहीत. त्यामुळे येत्या दोन दिवसांत मोठ्या नेत्यांच्या सभा होण्याची शक्यता असून, त्यामुळे वातावरण आणखी ढवळून निघण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीत बिघाडी
पैठणमध्ये महायुतीप्रमाणे महाविकास आघाडीतही बिघाडी झाली आहे. येथे उद्धवसेनेसोबतच काँग्रेसनेही नगराध्यक्षपदासाठी उमेदवार दिला आहे. त्यानुसार उद्धवसेनेकडून दत्तात्रय गोर्डे हे प्रचाराची धुरा सांभाळत असून, काँग्रेसकडून माजी मंत्री अनिल पटेल हे आपला राजकीय अनुभव पणाला लावत आहेत.