राणा दाम्पत्य मनोविकृत, रस्त्यावर येऊन स्टंट कशासाठी ? रुपाली चाकणकरांची जोरदार टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2022 19:05 IST2022-04-26T18:59:54+5:302022-04-26T19:05:22+5:30
राज्यातील शांतता भंग करण्याचा त्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला

राणा दाम्पत्य मनोविकृत, रस्त्यावर येऊन स्टंट कशासाठी ? रुपाली चाकणकरांची जोरदार टीका
औरंगाबाद : अमरावतीच्या खा. नवनीत राणा, आ. रवी राणा या दाम्पत्यास त्यांचा विकृतपणा नडला. राज्यातील शांतता भंग करण्याचा त्यांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला आहे, असे मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
‘महिला आयोग आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील तक्रारींचे निरसन करण्यासाठी त्यांनी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सुनावण्या घेतल्या. पहिल्या सत्रानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी चाकणकर यांना राणा प्रकरणात पत्रकारांनी प्रश्न विचारले.
राणा यांना खार पोलीस ठाण्यात पाणी दिले नाही, वाॅशरूम वापरू दिली नाही. असे आरोप त्यांनी केले आहेत. महिला म्हणून याबाबत आपले मत काय आहे, यावर चाकणकर म्हणाल्या, राणा यांनी केलेला प्रकार हा विकृत मनोवृत्तीचा आहे. पोलिसांवर आरोप करण्यात, त्यांना बदनाम करण्यात काही अर्थ नाही. कोरोना काळात याच पोलिसांनी मदत केली. ते सत्तेत्त असताना हेच पोलीस होते. विरोधी पक्षात आहोत, हेच त्यांना पचनी पडत नाही. त्यांना जे काय वाचायचे होते, ते घरात वाचायचे असते. रस्त्यावर येऊन कशासाठी स्टंट करायचे? महागाई, बेरोजगारीचे प्रश्न आहेत. फक्त हिरवे-भगवे, हिंदू-मुस्लीम असे वाद निर्माण करायचे, ही मनोविकृतीच आहे, अशी जोरदार टीका चाकणकर यांनी यावेळी केली.