कायगाव येथील आंदोलक उपचारासाठी घाटी रुग्णालयात, पण उपोषण सुरूच
By संतोष हिरेमठ | Updated: September 11, 2023 19:45 IST2023-09-11T19:40:37+5:302023-09-11T19:45:55+5:30
मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ८ दिवसांपासून उपोषण सुरु आहे

कायगाव येथील आंदोलक उपचारासाठी घाटी रुग्णालयात, पण उपोषण सुरूच
छत्रपती संभाजीनगर : मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ ८ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या देविदास पाठे यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाही उपोषण कायम ठेवण्याचा आणि पाणीही न पिण्याची भूमिका पाठे यांनी घेतली आहे.
कायगाव येथील हुतात्मा काकासाहेब शिंदे स्मृतिस्थळाजवळ देविदास पाठे हे उपोषणला बसले होते. उपोषणाच्या आठव्या दिवशी रविवारी प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी घाटीत दाखल करण्यात आले. त्यांच्यावर मेडिसीन विभागातील वार्डात उपचार सुरु आहे.
आंदोलकांनी मंडप पेटवला
शहरात पिसादेवी येथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी उपोषणाला बसलेल्या कार्यकर्त्यांनी मंडप पेटवून आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या धरपकडमध्ये एका कार्यकर्त्याचा हात भाजला.
मुक्तीसंग्राम दिनी घरावर काळे झेंडे
मराठा आरक्षणाचा प्रश्न न सोडवल्यामुळे सकल मराठा समाजाच्यावतीने मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी ( 17 सप्टेंबर रोजी) घरावर काळे झेंडे लावण्याचा आणि ध्वजारोहण कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. याविषयीची निवेदन सकल मराठा समाजाच्यावतीने विभागीय आयुक्त कार्यालयास देण्यात आले.