निवडणुकीची चाहूल लागताच गहू, तांदूळ, डाळींचे भाव उतरणीला
By प्रशांत तेलवाडकर | Updated: January 11, 2024 18:48 IST2024-01-11T18:47:48+5:302024-01-11T18:48:24+5:30
लोकसभा निवडणुकीत महागाईचा मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो.

निवडणुकीची चाहूल लागताच गहू, तांदूळ, डाळींचे भाव उतरणीला
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीची चाहूल लागली आहे; तसेच नवीन धान्याचे बाजाराला वेध लागले आहेत. अशा परिस्थितीत गव्हापाठोपाठ, ज्वारी, तांदूळ, डाळींचे भाव उतरणीला लागले आहेत. निवडणुकीत महागाईचा मुद्दा आड येऊ नये म्हणून केंद्र सरकारने भाववाढ रोखण्याची पावले उचलली आहेत. त्याचा परिणाम स्थानिक बाजारपेठेत दिसू लागला आहे.
‘भारत ब्रँड’च्या नावाने स्वस्तात विक्री
लोकसभा निवडणुकीत महागाईचा मुद्दा डोकेदुखी ठरू शकतो. यामुळे भाववाढ रोखण्यासाठी केंद्र सरकारने ‘भारत ब्रँड’च्या नावाने स्वस्त धान्य दुकान, तसेच आता माॅलमध्ये आटा, तांदूळ व डाळ विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. अजून सरकारी आटा, तांदूळ व डाळ शहरातील मॉलमध्ये विक्रीला आला नाही. मात्र, कमी किमतीत डाळींची विक्री शहरात होत आहे; तसेच सरकारकडे गोदामात मुबलक प्रमाणात धान्य, तांदूळ आहे. परिणामी, मोंढ्यात आटा, तांदूळ, डाळींचे भाव कमी होऊ लागले आहेत.
गव्हाचे उत्पादन विक्रमी होण्याचे संकेत
यंदा रब्बी हंगामात देशात ११.४ कोटी टन नवीन गव्हाचे उत्पादन होण्याचा अनुमान आहे. यामुळे तेजीची मानसिकता बदलली व क्विंटलमागे २०० रुपयांनी भाव कमी होऊन २८०० ते ३४५० रुपये दर आहेत. गव्हापाठोपाठ ज्वारीचे भाव ५०० ते ८०० रुपयांनी कमी होऊन शाळू ज्वारी ५००० ते ५५०० रुपये, तर कर्नाटकी ज्वारी ३५०० ते ४००० रुपये प्रतिक्विंटल विकली जात आहे.
तांदळातही मंदी
यंदा तांदळाच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला. निर्यातीमुळे तांदळाचे भाव वधारले होते. मात्र, सरकारी गोदामातील तांदूळसुद्धा आता कमी किमतीत म्हणजे ३० ते ३५ रुपये किलोने मिळणार आहे. परिणामी, स्थानिक बाजारात तांदळाचे भाव क्विंटलमागे ३०० ते ७०० रुपयांनी कमी होऊन ३६५० ते १० हजार रुपये आहेत.
डाळींत मंदी
दिवाळीनंतर पहिल्यांदाच डाळींच्या भावात मंदी आली आहे. हरभरा डाळीच्या भावात १००० रुपयांनी कमी झाले. सध्या ६३०० ते ६६०० रुपये प्रतिक्विंटल आहे. तुरीची डाळ २५०० रुपयांनी स्वस्त होऊन १२०० ते १२६० रुपये, तसेच ७०० ते ८०० रुपये घसरण होऊन मूगडाळ ९५०० ते १०२०० रुपये किलो, मसूर डाळ ५०० ते ७०० रुपयांनी मंदी येऊन ७५०० ते ८००० रुपये आहे.
आणखी भाव कमी होतील
यंदा ज्वारी, तुरीचे उत्पादन समाधानकारक आहे. त्यात गव्हाचे उत्पादन विक्रमी होत आहे. नवीन तुरीची आवक वाढत आहे. नवीन गहू, ज्वारीची आवक पुढील महिन्यात सुरू होईल. यामुळे भाव कमी होऊ शकतात.
- नीलेश सोमाणी,होलसेल व्यापारी