गर्भवतीस जिल्हा रुग्णालयातून पाठविले परत, रस्त्यातच प्रसूती होऊन बाळाचा मृत्यू
By संतोष हिरेमठ | Updated: March 20, 2023 20:57 IST2023-03-20T20:54:55+5:302023-03-20T20:57:19+5:30
घरी जाताना चिकलठाणा परिसरात अचानक प्रसूती झाली आणि बाळ रस्त्यावर पडले.

गर्भवतीस जिल्हा रुग्णालयातून पाठविले परत, रस्त्यातच प्रसूती होऊन बाळाचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर : जिल्हा रुग्णालयातून परत पाठविलेल्या महिलेची रस्त्यातच प्रसूती झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. या घटनेनंतर नातेवाईक आणि चिकलठाणा परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात धाव घेत संताप व्यक्त केला. त्यामुळे रुग्णालयात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
सुनीता योगेश नाडे (३१, रा. चिकलठाणा) असे प्रसूती झालेल्या आणि शिशू गमाविलेल्या महिलेचे नाव आहे. त्या जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आल्या होत्या. डॉक्टरने तपासून त्यांना प्रसूतीला वेळ असल्याचे सांगितले. त्यानंतर घरी जाताना चिकलठाणा परिसरात अचानक प्रसूती झाली आणि बाळ रस्त्यावर पडले. त्यांना तातडीने रुग्णालयात आणले असता बाळ दगावल्याचे सांगण्यात आले. . आईची प्रकृती गंभीर आहे.