'पद्मपाणी बुध्दाच्या हातात लेखणीची मशाल'; १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 18:23 IST2025-02-18T18:22:57+5:302025-02-18T18:23:44+5:30

१९ वे विद्रोही साहित्य संमेलन भारतीय संविधानाला समर्पित आहे.

The Padmapani Buddha of Ajanta has a torch of a pen in his hand instead of a peepal leaf; the emblem of the 19th Vidrohi Marathi Sahitya Sammelan is special | 'पद्मपाणी बुध्दाच्या हातात लेखणीची मशाल'; १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आहे खास

'पद्मपाणी बुध्दाच्या हातात लेखणीची मशाल'; १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह आहे खास

छत्रपती संभाजीनगर: विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्ह हे भारतीय बहु सांस्कृतिक बहुविविधतेचे प्रतिबिंब आहे. यातून बुध्दाची करूणा आणि परिघाबाहेर ढकलल्यांच्या वेदनेचा विद्रोह प्रतित होतो, असे प्रतिपादन विचारवंत डॉ. मुस्तजिब खान यांनी केले. सुभेदारी विश्रामगृहात डॉ. खान याच्या हस्ते नुकतेच १९ व्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले. 

शहरातील आमखास मैदानावर २१ ते २३ फेब्रुवारीदरम्यान १९ व्या अ.भा. विद्रोही मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या बोधचिन्हाचे प्रकाशन अभ्यासक विचारवंत प्रा. मुस्तजिब खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, चित्रकार राजानंद सुरडकर यांनी रेखाटलेल्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हातून सांस्कृतिक क्रांती घडवली आहे. अजिंठ्याच्या पद्मपाणी बुध्दाच्या हातात पिंपळ पाना ऐवजी लेखणीची मशाल दिली आहे. सोबतच या शहराची ठळक ऐतिहासिक ओळख असलेल्या बीबी का मकबऱ्याची मिनारही दर्शवला आहे. संविधानाची मोडतोड सुरु आहे. या जळत्या वास्तवालाही या बोधचिन्हातून दर्शवले आहे, असेही ते म्हणाले.

या वेळी प्रास्ताविक विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे राज्य कार्यकारी संघटक किशोर ढमाले यांनी केले. ते म्हणाले की, या बोधचिन्हातून विद्रोहाचा वारसा अधिक प्रखरपणे पुढे आणला आहे. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून सूर्यकांता गंगाधरजी गाडे, संजय जाधव, संमेलन स्वागताध्यक्ष सतिष चकोर, चित्रकार राजानंद सुरडकर, मुख्य निमंत्रक अॕड.धनंजय बोरडे, अनिलकुमार बस्ते, के.ई.हरिदास, प्रा.भारत सिरसाठ, धोंडोपंत मानवतकर, कार्याध्यक्ष खालिद अहमद, सुधाकर निसर्ग, भीमराव गाडेकर, सविता अभ्यंकर, राष्ट्रपाल वानखेडे, अनिल वानखेडे, वजिर शेख, कवि सुनील उबाळे आदिंसह संमेलनाच्या संयोजन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.आभार अनंत भवरे यांनी मानले.

संमेलन भारतीय संविधानाला समर्पित
१९ वे विद्रोही साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह  प्रसिद्ध चित्रकार राजानंद सुरडकर यांनी रेखाटले आहे. हे संमेलन भारतीय संविधानाला समर्पित आहे. संविधानाने प्रत्येक माणसाला समान लेखून समता, न्याय, बंधूता, मैत्री, वैज्ञानिक दृष्टिकोन ही मूल्यं दिली आहेत. संमेलन बोधचिन्हात भारतीय संविधानाच्या पार्श्वभूमीवर जगाला स्तब्ध करून टाकणाऱ्या अजिंठा लेणीतील पद्मपाणी बुध्दाचा अनुकंपेचा हात आहे. या हातात कालानुरूप 'स्वयं दिप हो' या वचनाला अधोरेखित करणारी लेखणीची मशाल दाखवली आहे.  ही लेखणीची मशाल एकाच वेळी 'स्वयंदीप' होण्यासाठी व प्रज्ञेने सर्वंकष अंधार जाळण्याची प्रेरणा आहे. गुलामीच्या  तुटलेल्या श्रृंखला,  बिबि का मकबऱ्याचा एक मिनार दर्शवला आहे. राजानंद सुरडकर यांनी आजपर्यंत विविध साहित्य संमेलनाचे बोधचिन्ह केले आहेत. विविध नियत कालिकात रेखाटने केलेली आहेत. विविध शहरांत चित्र प्रदर्शन केलेली आहेत. विद्रोही सांस्कृतिक चळवळीशी बांधिलकी असलेले आहेत. 

Web Title: The Padmapani Buddha of Ajanta has a torch of a pen in his hand instead of a peepal leaf; the emblem of the 19th Vidrohi Marathi Sahitya Sammelan is special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.